आपल्या शरीरासाठी झोप अत्यंत गरजेची असते. पुरेशी झोप आपलं आरोग्य निरोगी ठेवण्यास फायदेशीर ठरते. त्यामुळे आवश्यक तेवढी झोप घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जातो. माणसाला निरोगी राहण्यासाठी किमान सात ते आठ तास झोप घेणे आवश्यक असते. असे न झाल्यास त्याचा परिणाम शरीरावर व्हायला लागतो. त्यामुळे त्याकडे लक्ष देण्याचे सांगितले जाते.
ताणतणाव, टेन्शन अशा काही मानसिक समस्यांचा परिणाम आपल्या निद्रेवर होत असतो. तर काही वेळेस सकस आहार न घेतल्याने झोप लागत नाही. झोपेशी संबंधित निद्रानाशासारखे आजार देखील गेल्या काही वर्षांमध्ये बळावले आहेत. शांत झोप यावी यासाठी काही सोपे उपाय करता येतात. जर तुम्हाला झोप न लागण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही जीवनशैलीत हे काही बदल करून यापासून सुटका मिळवू शकता. जेवल्यानंतर 100 पावले चालणे, रात्री 10 वाजण्यापूर्वी झोपणे, फोन, लॅपटॉप, टीव्ही यांसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर झोपण्याच्या एक तास आधी न करणे आणि दररोज हे रूटीन फॉलो करावा.
तसेच निद्रानाशाच्या समस्येवर मेडिकेटेड मिल्क रामबाण उपाय म्हणून काम करते. ते तयार करण्यासाठी एक ग्लास दुधात 1/4 चमचे जायफळ पावडर, चिमूटभर हळद, चिमूटभर वेलची पावडर मिसळावी. हे मिश्रण 5 मिनिटे उकळवा. ते गाळून रोज झोपण्यापूर्वी सेवन करावे, असे केल्यास फायदा होऊ शकतो. याशिवाय, जर तुम्हाला रात्री झोपे न येण्याची समस्या होत असेल तर प्राणायाम तुमच्यासाठी झोपेचे औषध म्हणून काम करू शकतो. दररोज झोपण्यापूर्वी 5 मिनिटे प्राणायाम केल्यास फायदेशीर ठरू शकते.