सोलापूर : शाळेची फी भरली नाही म्हणून शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांची थेट पोलीस ठाण्यात रवाणगी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूरमधील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून उघकीस आला आहे. त्याशिवाय, फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यापासूनही वंचित ठेवल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे.
शाळा प्रशासनाच्या या मनमानी कारभाराविरोधात पालकांनी संताप व्यक्त केला आहे. याची तक्रार शाळा प्रशासनाने पोलिसात केली. या तक्रारीची दखल घेत आणि वाद मिटवण्यासाठी पोलिसांनी पालकांसह विद्यार्थ्यंनाही पोलीस व्हॅनमधून पोलीस ठाण्यात नेलं. घडलेल्या प्रकाराबद्दल जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात असून शाळा प्रशानावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
या प्रकरणात विद्यार्थ्यांची संपूर्ण फी भरलेली असतानाही काही विद्यार्थ्यांविरोधात आकासापोटी कारवाई केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. तसंच या विद्यार्थ्यांना दमदाटीही करण्यात आली. शाळेच्या मनमानी कारभाराची तक्रार शिक्षण मंत्र्यांकडे करण्यात आली होती. याचा राग मनात धरून शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना दमदाटी केल्याचा आरोपही पालकांनी केला आहे.
दरम्यान, शाळा प्रशासनाने मात्र पालकांचे हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. विद्यार्थ्यांचे पेपर पूर्णपणे सोडवून घेतल्याचा दावा शाळेने केला आहे. दुसरीकडे पालकांच्या सांगण्यावरुनच विद्यार्थ्यांना पोलीस व्हॅनमधून नेण्यात आल्याचा दावा पोलिसानी केला आहे.