नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरल यांना ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर न्यायालयातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दिल्ली उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरल यांना बुधवारी त्यांच्या अधिकृत खात्यावर ईमेल प्राप्त झाला.
वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, बलवंत देसाई नावाच्या व्यक्तीने 12 फेब्रुवारी रोजी दिल्ली उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलला पाठवलेल्या ईमेलमध्ये गुरुवारी बॉम्बस्फोट होईल आणि हा दिल्लीतील सर्वात मोठा स्फोट असेल असा इशारा दिला होता. ईमेलमध्ये लिहिले आहे की, ‘दिल्लीतील हा सर्वात मोठा स्फोट असेल. मंत्र्यालाही बोलवा, सर्वांना उडवले जाणार.’ असं ईमेलमध्ये म्हटले होते. हा ईमेल गांभीर्याने घेत अधिकाऱ्यांनी सुरक्षा वाढवली आहे.
या ईमेलनंतर उच्च न्यायालयाच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांना पत्र लिहिले आहे. उच्च न्यायालयाच्या सक्षम अधिकाऱ्याने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून, उच्च न्यायालयाच्या परिसरात सुरक्षा वाढवण्याची विनंती आयुक्तांना केली असल्याचे पत्रात म्हटले आहे. उच्च न्यायालयाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याची मागणी केली आहे.
दिल्ली हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील मोहित माथूर यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाबाहेर यापूर्वी झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर अधिकारी कोणतीही जोखीम पत्करू इच्छित नाहीत. त्यामुळे सुरक्षा कडक करण्यात आली आहे. न्यायालयाच्या कामकाजात कोणताही अडथळा नसून बारचे सदस्य सहकार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. माथूर म्हणाले की, न्यायालयाच्या आवारात येणाऱ्या लोकांची ओळखपत्रे तपासली जात आहेत. बारच्या सदस्यांची ओळख पटवण्यासाठी बार असोसिएशनचे कर्मचारीही प्रवेशद्वारावर उभे आहेत.