राहुलकुमार अवचट
यवत : मनोज जरांगे-पाटील यांच्या मुंबई येथील मोर्चानंतर सरकारने मराठा आरक्षणासाठी जीआर काढला होता. ‘सगेसोयरे’ असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. ती मागणी मान्य करण्यात आली; परंतु त्यावर अद्याप सरकारकडून कोणतीही ठोस अंमलबजावणी झाली नसल्याने जरांगे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. उपोषणाला पाठिंब्यासाठी आज (ता. १४) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. यवत येथील मराठा समाजबांधवांनी गावबंदीचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत यवत येथील व्यापारी वर्गाने उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवली.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी शुक्रवारपासून पुन्हा उपोषण सुरू केले आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी येथे ते उपोषणाला बसले असून, आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. शासनाने तातडीने विशेष बैठक बोलावून कायद्याची योग्य अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी जरांगे यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. उपोषणला पाठिंबा देण्यासाठी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली होती. या ‘बंद’ला प्रतिसाद म्हणून दौंड तालुक्यातील यवत व परिसरातील आजूबाजूच्या गावांसह भांडगाव, पाटस, वरवंड, चौफुला, खुटबाव आदी गावांत सकल मराठा समाजाच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला.
सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी दिलेल्या आश्वासनाची मागणी ताबडतोब पूर्ण करण्याची मागणी होत असून, यासाठी यवत गावातील सर्व मराठा समाज बांधव, व्यापारी व दुकानदार यांनी एक दिवस आपली दुकाने बंद ठेवली. महाराष्ट्र बंदला प्रतिसाद देऊन, मराठा आरक्षणासाठी मनोज जरंगे-पाटील यांना पाठिंबा दर्शवला.