पुणे : आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने अवैध दारू निर्मिती, वाहतूक आणि विक्रीवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागीय भरारी पथकाने जिल्ह्यात सहा गावात छापे टाकत ९९५ लीटर गावठी हातभट्टी दारूसह ७ लाख ९० हजार ५५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. भरारी पथकाने गेल्या २ दिवसात सोरतापवाडी, शिंदवणे, गाडामोडी, डाळींब, राजेवाडी आणि आंबळे या ठिकाणी छापे टाकले आहेत.
या कारवाईत ५ वारस आणि ३ बेवारस अशा ८ गुन्ह्यांची नोंद करून ९९५ लिटर गावठी हातभट्टी दारू, २५ हजार लिटर रसायण, ३ दुचाकी वाहने आणि गावठी हातभट्टी दारू निर्मितीचे साहित्य, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी रात्री अंधाराचा फायदा घेवून फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. पुणे विभागाचे राज्य उत्पादन शुल्क उप आयुक्त सागर धोमकर यांच्या आदेशानुसार अशा प्रकारच्या मोहिमा राबवून यापुढेदेखील अवैध दारू व्यवसायावर सातत्याने कारवाई करण्यात येणार असल्याचे पुणे विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक नरेंद्र थोरात यांनी सांगितले.
काहीच दिवसांपूर्वी जुना मुंबई-पुणे हायवेवर मोठी कारवाई
काहीच दिवसांपूर्वी जुना मुंबई-पुणे हायवेवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट दारूच्या ६० हजार बाटल्या जप्त केल्या होत्या. ६०० बॉक्समध्ये लपवण्यात आलेल्या बनावट मद्याची किंमत २१ लाख रुपये होती. जुन्या मुंबई-पुणे मार्गावर असलेल्या मामुर्डी गावाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही धडक कारवाई केली होती.
२३ जानेवारी रोजी एक ट्रक जुना मुंबई-पुणे हायवे रोडवर, मामुरडी गावाजवळ येथून जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून अधिकारी कर्मचाऱ्यांनी तो ट्रk अडवून त्याची तपासणी केली. यावेळी ट्रक मध्ये गोवा राज्यात निर्मित बनावट देशी दारू रॉकेट असल्याचं समोर आलं. पोलिसांना संत्रा ९० मि.ली. क्षमतेच्या ६० हजार बाटल्या इतका मुद्देमाल आढळून आला. या मुद्देमालाची किंमत तब्बल २१ लाख रुपये इतकी आहे. या गुन्ह्यात १५ लाखाच्या वाहनासह एकूण ३६ लाख रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला होता.