पुणे : हडपसरमधील मगरपट्टा सिटीत घरकाम करणाऱ्या एका महिलेवर कुटुंबाने चोरीचा आळ घेतल्यानंतर तिला चौकशीसाठी पोलीस चौकीत बोलावण्यात आले. चोरीच तपास करताना संबंधित महिलेला पोलिसांनीच बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर महिलेने पिण्यासाठी पाणी मागितले असता, तिला चक्क लघुशंका प्यायला सांगण्यात आल्याचा खळबळजनक आरोप महिलेने केला आहे. पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, दोषी आढळलेल्या दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह एका अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, तक्रारदार महिला मगरपट्टा सिटीत एका कुटुंबात घरकाम करते. या घरातून ऐवज चोरीला गेल्यानंतर त्यांनी मगरपट्टा पोलीस चौकीत तक्रार दिली. तसेच घरकाम करणाऱ्या महिलेवर संशय व्यक्त केला. तक्रारीनंतर मगरपट्टा पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांनी मुंढवा येथील या महिलेला पोलीस चौकीत चौकशीसाठी नेले. तेथे तपासादम्यान तिला बेदम मारहाण करण्यात आली. साडेचार तास डांबून ठेवण्यात आले.
दरम्यान, संबंधित महिला बराच वेळ घरी न आल्याने कुटुंबीय विचारपूस करण्यासाठी मगरपट्टा पोलीस चौकीत आले असता पोलिसांनी नातेवाईकांचीही दिशाभूल केली. मारहाण करणाऱ्या पोलिसांना चौकीत पाणी मागितले, तेव्हा त्यांनी लघुशंका पिण्यास सांगितले, असा आरोप महिलेने केला. मारहाणीमुळे महिलेला चालणे देखील मुश्किल झाले होते.
महिलेने मदतीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. युवा सेनेचे शहरप्रमुख सनी गवते, शुभम दुगाने, बाबासाहेब कोरे, प्रसाद खुडे, मोहन भालेराव यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना निवेदन दिले. महिलेला बेदम मारहाण करणाऱ्या पोलिसांविरुद्ध कारवाईची मागणी केली.
सहपोलीस आयुक्तांनी याप्रकरणी चौकशी करुन कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. महिलेला पोलीस चौकीत बेदम मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर संताप व्यक्त करण्यात आला.
या प्रकरणाविषयी बोलताना पोलीस उपायुक्त आर. राजा म्हणाले की, प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यासह एका अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.