पुणे : पुण्यातील वरंध घाटात बोलेरो जीप दरीत कोसळली. पुण्यावरून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या मार्गावरील वरंध घाटात बोलेरो जीप १५० फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली आहे. ही घटना सोमवारी १२ फेब्रुवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास शिरगांव गावाच्या हद्दीत वरंध घाटात घडली.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पुण्याहून भोरमार्गे महाडकडे बोलेरो जीप निघाली होती. यावेळी वरंध घाटात शिरगांव गावाच्या हद्दीत चालकाला वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने जीप रस्त्याच्या कडेला १५० फूट खोल दरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. चालकाला सुखरूप बाहेर काढले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गाडी झाडी झुडपात अडकल्यानं सुदैवानं जीप चालक थोडक्यात बचावला. मात्र या अपघातात गाडीचे मोठं नुकसान झालं आहे.