पुणे: पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने शिरूमध्ये पिस्टल बाळगणारी टोळी जेरबंद करून तीन गावठी पिस्टल व नऊ जिवंत काडतूस हस्तगत केले आहेत. ही कारवाई १० फेब्रुवारी रोजी करण्यात आली. या प्रकरणी संकेत संतोष महामुनी (वय २४, रा. सरदवाडी, ता. शिरूर, जि. पुणे) अभिषेक ऊर्फ घ्या हनुमान मिसाळ (वय २३, रा. सोनारआळी, शिरूर), शुभम दत्तात्रय दळवी (वय २७, रा. प्रितमप्रकाश नगर, शिरूर), गणेश ऊर्फ श्रीरंग शंकर महाजन (वय ३० रा. गोलेगाव, ता. शिरूर) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १० फेब्रुवारी रोजी ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखाचे पथक शिरूर परीसरात आणि शिरूर पोलीस स्टेशनकडील दाखल गुन्हे उघडकीस आणण्यासाठी समांतर तपास करत होते. या दरम्यान पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत गोलेगावाकडे जाणाऱ्या रोडवर पुणे ते अहमदनगर हायवे ब्रीज जवळ काळया रंगाच्या काचा असलेली एक लाल रंगाची स्विफ्ट कार पहाटेच्या वेळी येणार असून कारमधील इसम हे पिस्टल ची देवाण घेवाण करणार आहेत, अशी बातमी मिळाली.
सदरची माहिती वरीष्ठांना सांगून त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून गोलेगावाकडे जाणाऱ्या रोडलगत पुणे-अहमदनगर हायवे ब्रीज येथे आलेल्या एका लाल रंगाचे स्विफ्ट कारवर कारवाई केली. या कारमध्ये रेकॉर्डवर असणारे वरील चार गुन्हेगार मिळून आले. त्यांच्याकडून तीन गावठी पिस्टल व नऊ जिवंत काडतूस जप्त करण्यात आली. या चारही आरोपींवर अवैध अग्निशस्त्र बाळगणे व शरीराविरूद्धचे मारामारीचे गुन्हे यापुर्वी दाखल असून यातील आरोपी संकेत संतोष महामुनी याला काही महिन्यांपूर्वीच अवैध पिस्टल बाळगून विक्री केल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलीसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून आठ पिस्टल हस्तगत केले होते.
सदर आरोपींना शिरूर न्यायालयात हजर केले असता त्यांना १३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोडी देण्यात आली असून आरोपींनी अवैध पिस्टल कोठूनआणले आहेत, कोणत्या कारणासाठी आणले होते, याबाबत पुणे ग्रामीण पोलीस तपास करत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोसई गणेश जगदाळे, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजू मोमीण, अतुल डेरे, विक्रम तापकीर, संजय जाधव, योगेश नागरगोजे, चालक सहाफो मुकुंद कदम, चालक पो.कॉ. दगडू विरकर यांनी केली आहे.