लहू चव्हाण
पाचगणी : सध्या सत्तेच राजकारण चालल असून समाजाचे विघटन करून दुफळी करण्याचा डाव आखला जात आहे. यशवंतराव चव्हाण यांचा जिल्हा शरद पवार साहेब आणि राष्ट्रवादीच्या पाठीशी जसा अभेद्य उभा होता त्याच पद्धतीने आगामी निवडणुकांमध्ये सर्वांनी ही ऐकी कायम दाखवावी असे आवाहन विधानपरिषदेचे माजी अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
पुस्तकांचे गाव भिलार येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रामराजे निंबाळकर बोलत होते.
यावेळी माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, माजी पालकमंत्री शशिकांत शिंदे, आमदार मकरंद आबा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, महाराष्ट्र आय टी सेल अध्यक्ष सारंग पाटील, तालुका अध्यक्ष बाबुराव संकपाळ, राष्ट्रवादी जिल्हा युवक अधक्ष तेजस शिंदे, बाळासाहेब सोळस्कर, महिला अध्यक्ष विमल पार्टे, धोंडीराम जंगम, पांचगणी पालिकेचे माजी उपाध्यक्ष नारायण बिरामणे, अर्बन बँकेचे अध्यक्ष दत्ता वाडकर, सहकार बोर्ड संचालक महादेव दुधाने, सरपंच शिवाजी भिलारे, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, नितीन दादा भिलारे, प्रवीण भिलारे, राजेंद्र भिलारे, माजी सभापती संजूबाबा गायकवाड, विश्वनाथ सपकाळ, मुख्याध्यापिका सौ.तेजस्विनी भिलारे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यापुढे बोलताना रामराजे म्हणाले, “सध्या सत्ताकेंद्रे ही व्यक्तिकेंद्रित करण्याचे राजकारण चालू असून हे देशासाठी घातक आहे. गैरमार्गाने सत्ता मिळवून एकत्र बसलेल्या राजकारण्यांकडे कसलेही विकासाचे धोरण नाही. उलट याला संपव, त्याला फोड, आमक्याला तुरुंगात टाक, इडी लाव, बिडी लाव,निम्मा वेळ सुप्रीम कोर्टात जातोय या उद्योगातून त्यांना राज्याकडे बघायला वेळ नाही. एक वर्ष झाले तरी नगरपालिका निवडुका घेत नाहीत प्रशासक आहेत कसा विकास होणार हे तर जनतेला आणि राज्याला अधोगतीकडे नेणारे सरकार आहे अशी टीकाही त्यांनी केली.”
शशिकांत शिंदे म्हणाले “राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पाठिंबा देणारा पहिला नेता स्व. बाळासाहेब भिलारे हे होते. या ठिकाणी पक्षाची बीजे रोवली गेली त्याच मातीत आपण सत्तेनंतर संघर्षासाठी जमलोय. त्यामुळे ५० खोक्यांचा इतिहास सांगणारे सरकार १०० टक्के पडणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. सत्तेतील मानस कपटी आहेत. देश ऐका छत्राखाली आणण्याचा प्रयत्न चालू आहे. या कारस्थानांना हुकूमशाहीचा वास येतो आहे. ही हुकूमशाही उलठवण्याची ताकद आमच्या महाराष्ट्रात आहे. हिम्मत असेल तर लावा निवडणुका दाखवतो आम्ही आमची ताकद पण त्यांच्याकडे भीती आहे. असे सरकार उलथवण्यासाठी आपण सज्ज होवू यात आणि कामाला लागू असेही शिंदे यावेळी म्हणाले.
बाळासाहेब पाटील म्हणाले “सत्ताधाऱ्यांकडे कसलाही कार्यक्रम नसून आपणाला काय करायचंय, शासनाच्या योजना सांगण्यापेक्षा जिथं जाईल तिथल्या नेत्यांची मापे काढणे त्यांच्यावर विनकानार आरोप करणे हाच उद्योग या मंडळींचा चालू आहे.
मकरंद आबा पाटील म्हणाले आपल्या समोर आव्हान खूप आहेत. पण महाबळेश्वर तालुका जसा स्व.बाळासाहेब भिलारे यांच्या पाठीशी उभा राहिला त्याच ताकदीने राष्ट्रवादीच्या पाठीशी असून आगामी काळात पांचगणी, महाबळेश्वर आणि वाई नगरपालिकांसह पंचायत समिती आणि जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेसचे जिंकणार असा सूतोवाच केला.
या मेळाव्यास अगदी दुर्गम तापोळा, कुंभरोशी, कांदाट, कोयना सोळशी विभागातून मोठया प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी गर्दीने अक्षरशः खुर्च्या कमी पडल्या. संजूबाबा गायकवाड यांनीही भाषण केले. राजेंद्र शेठ राजपूरे यांनी प्रास्ताविकात विविध प्रश्नांचा व समस्यांचा आढावा घेतला.
दरम्यान, या मेळाव्यासाठी आपल्या संघटन कौशल्याच्या कल्पकतेने स्व. बाळासाहेब भिलारे यांच्या सूनबाई तेजस्विनी भिलारे यांनी मेळाव्यासाठी जास्तीत जास्त महिला आणल्याने याचे कौतुक सर्वच नेत्यांनी केले रामराजे नाईक निंबाळकर यांनी तर या हिरकण्या आपल्या पाठीशी असताना आपण भ्यायच कशाला असे सांगितले. नितीन दादा भिलारे यांनी स्वागत केले. प्रमोद पवार यांनी सूत्रसंचालन केले तर संजय जंगम यांनी आभार मानले.