अजित जगताप
सातारा : माणसाच्या आयुष्यात त्यांची किंमत ही मरणानंतरच समजते. त्यामुळे ज्यांनी समाज्यासाठी मरणयातना भोगल्या. कष्ट घेतले त्यांना त्यांच्या मृत्यूनंतर समाज मान्यता लाभते. अश्या थोर व्यक्तींपैकी खटाव तालुक्यातील मोळ गावचे सुपुत्र व प्राथमिक शिक्षक समितीचे आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून आज गुरुवर्य गणपतराव गेनबा काळंगेगुरुजी यांना ओळखले जाते. आज रविवारी दि ९ ऑक्टोबर रोजी त्यांच्या मोळ ता खटाव गावात त्यांच्या अर्ध पुतळ्याचे अनावरण त्यांच्या जन्म गावी होत आहे. याचा ग्रामस्थ, शिक्षक समितीचे सदस्य, पदाधिकारी, विद्यार्थी वर्गाला मनापासून आनंद वाटत आहे.त्यानिमित्त त्यांचा परिचय नव्या पिढीला व्हावा यासाठी ही माहिती संकलन केली आहे.
शिक्षण क्षेत्रात बहुजन समाजाला शिक्षण घेता यावे यासाठी शिक्षण गुरू महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी रचला पाया व कर्मवीर भाऊराव पाटील,बापूजी साळुंखे झाले कळस अशा ओळख आहे.तो शिक्षक पेशा म्हणजे समाज्याने आदर्श घ्यावा असे व्यक्तिमत्त्व पूर्वीच्या काळात होते.आज ही काही प्रमाणात त्याचा अंश शिल्लक आहे . काही अपवाद वगळता आज ही गुरु म्हणून नतमस्तक व्हावे असे समाज्यातील शिक्षक वर्ग आहेत. त्यांनी स्वतःचे चारित्र्य जपले. त्याचा फायदा समाज मनावर झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी किती ही मोठा झाला तर त्याचे श्रेय हे त्यांच्या गुरुजनांना जाते.
याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. महाभारताच्या कथेत द्रोणाचार्यांनी आदिवासी समाज्यातील एकलव्याचा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून मागितला होता. तेव्हापासून काही जणांना एकलव्याचा अंगठा न घेण्याची शप्पथ घ्यावी लागली आहे.ज्यांनी गरीब एकलव्याचा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून मागितला.त्यांच्या नावाने सरकार सुध्दा पुरस्कार जाहीर करते पण, ज्यांनी खरे कार्य केले ते उपेक्षित रहातात.त्यांचा आता गौरव होत आहे. ही आनंदाची बाब आहे.
विशेष म्हणजे बहुजन समाजातील मुले आता शिक्षण क्षेत्रात भरारी मारत आहेत. बहुजन समाजातील मुले शिक्षण क्षेत्राकडे आल्यापासून अनेक एकलव्य घडले आहेत. पण, ज्यांनी एकलव्य घडविले त्या गुरुजींचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले ते गुरुवर्य काळंगेगुरुजी यांनी ग्रामीण भागात विध्यादाना सोबत शिक्षकांनाही मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत.त्यांचे एकेकाळी शिष्य असलेले विधिमंडळाच्या सभागृहातील मुलुख मैदानी तोफ आदरणीय चिमणराव कदम यांना त्यांनी घडविले. एक आदर्श लोकप्रतिनिधी केले. आज काही लोकप्रतिनिधिंची भाषा म्हणजे त्यांच्या राजकीय गुरुजनांचा उध्दार होत आहे. हा फरक आहे. त्यामुळे गुरूंना नमन करताना त्यांच्या विचारांचे ही कौतुक करावे लागते.
आज अनेक ठिकाणी युगप्रवर्तक, राजकीय, सामाजिक,शैक्षणिक,उधोग क्षेत्रातील लोकांच्या नावाने शाळा, महाविद्यालये आहेत पण, एका शिक्षकांच्या नावाने प्राथमिक शाळा सुरू करणे हे फक्त सातारा जिल्ह्यातच घडू शकते. याची प्रचिती सर्वानाच आली आहे. सातवी पर्यत शिक्षण घेतलेले गुरुवर्य गणपतराव गेनबा काळंगेगुरुजी म्हणजे प्राथमिक शिक्षक समितीसाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे. मोळ येथील गरीब कुटुंबातील सदस्य असलेल्या गुरुजींचा जन्म दि २५ मे १९२३ साली झाला. गरिबीच्या चटक्याने त्यांना घरची परिस्थिती स्वस्त बसू देत नव्हती. शिक्षणाची गोडी निर्माण झाली होती. पण, पुढे फार काही शिकता आले नाही. परंतु, जुन्या सातवी पर्यंत शिक्षण झाल्याने त्यांना त्याकाळी असलेल्या एक संघ सातारा जिल्ह्यातील लोकल बोर्डाच्या शाळेत उपशिक्षक म्हणून नोकरी मिळाली.
त्याकाळी दोन आकडी वेतन असल्याने शिक्षकांना आताच्या सारखे जगता येत नव्हते पण, सुख समाधान भरपूर मिळत होते. गावातील सार्वजनिक कार्यक्रम, यात्रा, लग्नसराई व घरगुती कार्यक्रमात शिक्षकांची उपस्थिती म्हणजे मोठा आशिर्वाद मानला जात होता. मंत्री, खासदार, आमदार,अधिकारी वर्ग नतमस्तक होत होते. असा काळ भोगलेल्या गुरुवर्य गणपतराव गेनबा काळंगेगुरुजी यांनी कधी ही बदली अथवा शिक्षक बँकेच्या संचालक पदासाठी स्वाभिमान गहाण ठेवला नाही. करारी बाणा व स्वच्छ चारित्र्य राखूनच असंख्य शिक्षकांचे प्रश्न मोठ्या उत्साहात सोडविले. कधी ही संघर्ष करण्यास डगमगले नाहीत. साधी राहणी व उच्च विचारसरणी अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांच्या बंधूंना निवृत्ती काळंगे यांना तेथील मतदारांनी सातारा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आणले होते. सर्व शिक्षकांनी घरची भाजी-भाकरी खाऊन कधी सायकलवर तर कधी पायी चालत जाऊन प्रचार केला होता.
त्यानंतर अनेक शिक्षक जिल्हा परिषद सदस्य झाले पण, तेवढी उंची कोणालाही गाठता आली नाही. ही वस्तुस्थिती आहे. आपण ज्या शाळेत शिक्षक म्हणून काम करीत आहे. तेथील शाळेचा निकाल शंभर टक्के लावण्यासाठी त्यांनी अभ्यासिका व ज्यादा तास सुरू केले होते. गिरवी ता फलटण, खटाव तालुक्यातील मोळ, राजापूर, दरुज येथे त्यांनी एक आदर्श पिढी घडविली होती. त्याचे अनेकजण साक्षीदार आहेत.काळंगेगुरुजी यांनी प्राथमिक शिक्षक समितीचे रोपटं दि २२जुलै १९६२ साली लावले होते. त्याचा वटवृक्ष बनला आहे,ही प्रेरणा गुरुवर्य काळंगेगुरुजींची आहे, त्यामुळे त्यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक शिक्षक समितीचे आदर्श व पुरस्कार प्राप्त शिक्षक नेतेगण उपस्थित झाले आहेत. हा दुग्ध शर्करा योगायोग मानला जात आहे.त्यांचा आदर्श घेऊनच या पुढे शिक्षक समिती वाटचाल करील अशी आशा आहे
पत्रकार अजित जगताप, सायगाव ता जावळी जि सातारा ९९२२२४१२९९/९१५६१४०४९१