लोणी काळभोर : विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणाबरोबर एक कला आत्मसात केली पाहिजे. कारण, कला ही माणसाला सामाजिकरित्या जिवंत ठेवते. कलेच्या सहवासामुळे खऱ्या अर्थाने माणूस घडतो आणि त्याला दैनंदिन कामाव्यतिरिक्त एक आनंदी जीवन जगण्याची प्रेरणा व संधी प्राप्त होते, असे मत सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या सहाव्या ‘पर्सोना फेस्ट-२४’च्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू, ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचे कार्याध्यक्ष व कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, एमआयटी ‘मिटकॉम’च्या कार्यकारी संचालक प्रा. डॉ. सुनिता कराड, प्र. कुलगुरू डॉ.अनंत चक्रदेव, डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, डॉ. विरेंद्र शेटे, डॉ. रजनीशकौर सचदेव-बेदी, डॉ. नचिकेत ठाकूर, डॉ. मिलिंद ढोबळे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी अभिनेत्री सोनाली यांनी आपल्या आवाजात ‘शिववंदना’ सादर केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या अंगात जोश संचरला होता. त्या पुढे म्हणाल्या की, महाविद्यालयीन जीवन हे प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा काळ असतो. कारण याच काळात विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने त्याला नेमका कोणत्या क्षेत्रात रस आहे, याची जाणीव होते. त्याचसाठी ‘पर्सोना’सारखे फेस्ट विद्यार्थ्यांना त्यांच्यातील विविध कलागुणांचा साक्षात्कार होण्यासाठी व त्यांच्यातून प्रेरणा घेण्यासाठी महत्त्वाचे ठरतात. अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने या वेळी सैराट चित्रपटातील तिचा प्रसिद्ध डायलॉग म्हणून उपस्थितांची मने जिंकली. यासह तिने विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन दिवसांचा भरभरून आनंद घेण्याचे आवाहन देखील केले.
या वेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा. डॉ. कराड म्हणाले की, विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण न देता त्यांच्यातील कलाकार, गायक, चित्रकार, कवीच्या आवडी-निवडींना प्रोत्साहन देण्यासाठी व त्या माध्यमातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ‘पर्सोना फेस्ट’चे दरवर्षी आयोजन केले जाते. ‘पर्सोना’सारख्या कलात्मक उत्सवांच्या माध्यमातूनच देशाच्या कला संस्कृतीत भर टाकण्याचे बाळकडू विद्यार्थ्यांना विद्यापीठीय जीवनात मिळते. त्याचमुळे एमआयटी शिक्षण संकुलातून पास होऊन बाहेर पडणारा विद्यार्थी सामाजिक जीवनात मोठे नाव कमावतो.
‘पर्सोना फेस्ट’साठी विश्वराजबागेचा कॅम्पस अतिशय सुंदररित्या सजविण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. पुढील चार दिवस चालणाऱ्या या कला उत्सवासाठी अभिनेता आदिनाथ कोठारे, अंकुश चौधरी व स्टाँडअप विनोदवीर गौरव कपूरसह अनेक सेलिब्रेटी विद्यापीठात हजेरी लावणार आहेत.