पुणे : पुण्यातील शरद मोहोळच्या हत्येनंतर त्याची पत्नी स्वाती मोहोळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. ही धमकी मार्शल लुईस लीलाकर (रा. आकुर्डी) याने दिल्याची माहिती समोर आली आहे. या आरोपीला पोलिसांनी सायबर गुन्ह्यात अटक केली होती. धक्कादायक बाब म्हणजे पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन या आरोपीने ससून हॉस्पिटलमधून पलायन केले आहे. या घटनेमुळे पुणे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सोशल माध्यमावरून रील्स आणि कमेंट करून शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांना धमकवल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी लीलाकार याला काही दिवसांपूर्वी अटक केली होती. अश्लील शिवीगाळ, कमेंट प्रकरणी त्याच्यावर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
आज पहाटेच्या सुमारास लीलाकरने पोटात दुखत असल्याचा बाहाणा केला. त्यामुळे येरवडा जेलमधून त्याला ससून हॉस्पिटलमध्ये औषधोपचारासाठी आणण्यात आले होते. यावेळी मार्शल लुईस लीलाकर याने पोलिसांना गुंगारा देत पळ काढल्याची माहिती समोर आली आहे. फरार असलेल्या लीलाकर याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी ८ पथके पाठवली असून, त्याचा पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मात्र, या प्रकरणानंतर पुणे पोलिसांवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
दरम्यान, ड्रग्स माफिया ललित पाटील हा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा शरद मोहोळ यांच्या पत्नी स्वाती मोहोळ यांना धमकावणारा आरोपी लीलाकर याने ससून रुग्णालयातून पळ काढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्याला पकडणे हे पुणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. काही दिवसांपूर्वी कुख्यात गुंड शरद मोहोळची पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पत्नी स्वाती मोहोळला जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. या प्रकरणी स्वाती मोहोळने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार लीलाकर याला अटक केली होती. मात्र आता त्याने पळ काढल्याने पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.