पुणे : लोणावळ्यात आज सकाळी 7 ते 11 या वेळेत विक्रमी 115 मिमी पावसाची नोंद झाली. आज सकाळपासून लोणावळ्यात मुसळधार पाऊस पडत आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास येत्या २४ तासांत लोणावळा धरणातील पाणी लोणावळा शहराकडे येईल, अशी माहिती टाटा धरणाचे प्रमुख बसवराज मुन्नोत यांनी दिली आहे.
लोणावळा शहरातील नांगरगाव, वळवण, तुंगार्ली, रायवूड, बारा बंगला, बाजार परिसर, भांगरवाडी, बसस्थानक परिसर या भागातील रस्ते मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेले आहेत.
पावसाचा जोर वाढत असल्याने नागरिकांनी महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान काल संपलेल्या 24 तासात लोणावळ्यात 220 मिमी पावसाची विक्रमी नोंद झाली होती. तसेच कालपर्यंत एकूण 1,522 मिमी पावसाची नोंद झाली जी गेल्या वर्षीपेक्षा जास्त आहे.