मुंबई: ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. फेसबुक लाईव्ह सुरु असताना घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. मॉरिस नोरोन्हा या गुंडाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्याचा संशय आहे. मात्र, त्यानेही नंतर स्वत:ला संपवलं. घोसाळकर मृत्यूप्रकरणाबाबत उद्धव ठाकरे यांनी काही शंका व्यक्त केल्या आहेत. मातोश्रीवर पारपडलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी त्या व्यक्त केल्या.
अभिषेक घोसाळकर मृत्यूप्रकरणाबाबत फेसबुक लाईव्हच्या व्हिडिओत मॉरिस गोळ्या झाडताना दिसत नाही. मॉरिस नोरोन्हा याच्याकडे परवानाधरक शस्त्र नव्हते. त्याने त्याचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्र याच्या बंदुकीतून गोळ्या झाडल्याचे सांगितले जाते. मॉरिससारख्या गुंडाला अंगरक्षकाची गरज का लागावी? अमरेंद्र मिश्रा याच्या बंदुकीतून नेमक्या कोणी गोळ्या चालवल्या, हा प्रश्न अनुत्तरित आहे. असे अनेक प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले.
फेसबुक लाईव्हमध्ये कॅमेऱ्याच्या मागून गोळ्या झाडणारी व्यक्ती नेमकी कोण होती? हे समजू शकलेले नाही. कॅमेऱ्यामागून गोळ्या झाडणारी व्यक्ती मॉरिसच होता हे कशावरुन? हे प्रकरण वरकरणी वाटतं तितकं सोपं नाही. एकवेळ आपण मान्य करु की, मॉरिसने सूडाच्या भावनेतून घोसाळकरांवर गोळ्या झाडल्या. मग त्याने स्वत: आत्महत्या का केली? हा प्रश्न आहे. हा एकूणच प्रकार संशयास्पद असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. आणखी कोणत्या व्यक्तीला मॉरिस आणि अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्याची सुपारी देण्यात आली होती का, असा प्रश्नदेखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.