पिंपरी : एटीएम सेंटरमधून पैसे काढण्यास मदत करण्याच्या बहाण्याने एटीएम कार्ड बदलून सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करून, त्याच्या एटीएममधून ४० हजार रुपये लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.
याबाबत वाल्हेकरवाडी येथील एका ६१ वर्षाच्या सेवानिवृत्त नागरिकाने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे बुधवारी सकाळी चिंचवड पोलीस ठाण्याशेजारील एटीएम मशीनमध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. परंतु चुकीचा पिन टाकल्याने पैसे निघाले नाहीत. ही संधी साधून शेजारील एटीएम मशीनवर आधीपासून पैसे काढण्यासाठी उभ्या असलेल्या एकाने त्यांना मदत करण्याचा बहाणा केला.
‘आजोबा, काही अडचण आहे का’, अशी विचारणा केल्यावर, त्यांनी पैसे निघत नसल्याचे सांगितले. मी प्रयत्न करुन पाहतो, असे सांगून भामट्याने पैसे काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, पैसे निघाले नाहीत. चुकीचा नंबर टाकल्याने आता पैसे निघणार नाहीत, असे सांगून त्याने एटीएम कार्ड परत देवून तो निघून गेला.
दरम्यान, फिर्यादी घरी जात असताना त्यांच्या मोबाईलवर पैसे काढल्याचे दोन मेसेज आले. याबाबत विचारणा करण्यासाठी ते बँकेत गेले. तोपर्यंत आणखी तीन वेळा पैसे काढल्याचा मेसेज आला. बँकेत विचारपूस केल्यावर त्यांच्या खात्यातून पैसे काढले गेल्याचे लक्षात आले. तेव्हा त्यांनी आपल्याकडील कार्ड तपासले असता अभिषेक कैलास जाधव याचे नाव असलेले एटीएम कार्ड दिसून आले.
चोरट्याने हातचलाखीने एटीएम कार्डची अदलाबदली करुन त्यांच्या कार्डचा वापर करुन खात्यातून ४० हजार रुपये काढून घेऊन फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले.