पुणे : पुण्यातील नवीन पुरंदर विमानतळाचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. लोहगाव विमानतळावर अतिरिक्त ताण येत आहे. त्यामुळे पुण्यातील लोहगाव विमानतळाबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी १३७ एकर जाग संपादीत केली जाणार आहे. आता लोहगाव विमानतळ आता नव्या सुसज्ज रुपात पुढे येणार आहे. विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन येत्या १९ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ फेब्रुवारी रोजी लोहगाव विमानतळाच्या नवीन टर्मिनलच्या उद्घाटनासाठी येत आहेत. त्यामुळे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी एअरपोर्ट अथॉरिटीसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी विस्तारीकरणाचा विषय मार्गी लावला.
लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी ६० टक्के निधी हा राज्य सरकार देणार आहे. तसेच ४० टक्के निधी हा पुणे महापालिका, पिंपरी महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) देणार आहे. यासंदर्भात लवकरच अधिकृत निर्णय जाहीर होणार आहे.
दरम्यान, लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरण प्रकल्पाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी केंद्र सरकारने सुमारे ४७६ कोटी रुपये खर्च केले आहेत. उद्घाटनानंतर विमानतळावरील एकूण चेक इन काऊंटर्स ३४ होणार आहेत. तर, पाच एरोब्रिज होतील. तसेच प्रती तास सुमारे २३०० प्रवासी विमानतळावरील सुविधांचा वापर करू शकतील, अशा पद्धतीने विस्तारीकरणाचा प्रकल्प तयार करण्यात आला आहे.
विमानतळ प्राधिकरणाने बांधलेल्या नवीन टर्मिनलचे सुमारे ५ लाख चौरस फुटापेक्षा जास्त क्षेत्रफळ त्याचे आहे. त्यात अत्याधुनिक सोयीसुविधांची निर्मिती केली आहे. नवीन टर्मिनलमुळे दरवर्षी १ कोटींपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करु शकणार आहे. लोहगाव विमानतळावरुन नवीन टर्मिनल सुरु झाल्यावर विमानांच्या उड्डाणांची संख्या १२० होणार आहे.