पुणे: आळंदी जवळ एका कंपनीत गुरुवारी सायंकाळी आग लागली. प्राथमिक माहितीनुसार ही आग इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन लागल्याचे समोर आले होते. परंतु, यावर आता महावितरणचे जनसंपर्क अधिकारी निशिकांत राऊत यांनी खुलासा करत ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झालेला नाही. त्यातून होणारा इलेक्ट्रिक सप्लाय बंद आहे. ट्रान्सफॉर्मर बंद अवस्थेत होता, असे म्हंटले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आळंदी नजीकच्या सोळू गावात (ता. खेड) गुरूवारी (दि. 8) दुपारी साडेचारच्या सुमारास महावितरणच्या वितरण रोहित्राचा स्फोट होऊन काही घरांना आग लागल्याची माहिती चुकीची आहे. या आगीशी काहीही संबंध नाही तसेच वीजबिलाच्या थकबाकीमुळे गेल्या सहा महिन्यांपासून संबंधित रोहित्राचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे असा खुलासा महावितरणकडून करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, आळंदी नजीक मरकळ रस्त्यावरील सोळू (ता. खेड) या गावात आज दुपारी आग लागली. या ठिकाणी असलेल्या वितरण रोहित्राचा स्फोट होऊन आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. महावितरणच्या चाकण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता विजय गारगोटे व सहायक अभियंता संदीप कुऱ्हाडे यांनी तातडीने सोळू येथे वीजयंत्रणेची पाहणी केली. यामध्ये घटनास्थळी असलेल्या 63 केव्हीए क्षमतेच्या रोहित्राचा प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारचा स्फोट झाल्याचे आढळून आले नाही. तसेच आग लागल्याचे देखील दिसून आले नाही.
आग विझवल्यानंतरही हा रोहित्र सुस्थितीत असल्याचे आढळून आले. मात्र बाजूची भिंत पडल्याने रोहित्राचे वीजखांब वाकले आहेत. आणखी एक वस्तुस्थिती अशी आहे की, या रोहित्रावरून केवळ एका ग्राहकाला वीजजोडणी देण्यात आली आहे. मात्र संबंधित ग्राहकाचे वीजबिल थकीत असल्याने गेल्या सहा महिन्यांपासून या रोहित्राचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे सोळू येथील आगीशी महावितरणच्या रोहित्राचा कोणताही संबंध नसल्याचे घटनास्थळी केलेल्या प्राथमिक तपासणीत आढळून आले आहे.