राहुलकुमार अवचट
यवत : यवत, सासवड आणि जेजुरी परिसरात गाड्यांचे सायलन्सर चोरून धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला यवत पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. चोरट्यांकडून ४ गुन्ह्यांची उकल करून तब्बल २ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
रोहित रंगनाथ अडसूळ ( वय -१९ सद्या रा.गणेशनगर धायरी, मुळ रा.तडवळ ता. जि. उस्मानाबाद) त्याचा साथीदार गौरव होगले आणि भंगार विक्रेता तसब्बूर युसूफ मलिक( सध्या रा.रामटेकडी मूळ रा. मुंडली ता.जि मेरठ राज्य उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
यवत पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, यवत येथील भुलेश्वर मार्केट समोर लावलेल्या मारुती सुझुकी कॅरी मॉडेलचा टेम्पोचा सायलेन्सर चोरून नेल्याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात २१ सप्टेंबर २०२२ला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी आरोपींना पकडण्यासाठी यवत गुन्हे शोध पथकाला सूचना दिल्या होत्या.
सायलन्सर चोरी करणाऱ्या टोळीला शोध घेत असताना, पथकाने परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे फुटेजच्या आधारे संशयित इसमाची माहिती घेण्यास सुरुवात केली. तेव्हा पथकास गणेशनगर धायरी येथील रोहित अडसूळ याने त्याचा साथीदार गौरव होगले याचे सोबत सदरचा सायलेन्सर चोरीचा गुन्हा केला आहे. अशी माहिती एक खबऱ्या मार्फत मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस पथकाने गणेशनगर धायरी येथे जाऊन संशयित आरोपी रोहित अडसूळ यास ताब्यात घेतले.
त्यानंतर यवत पोलिसांनी आरोपी रोहित अडसूळ याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपीने सदरचा गुन्हा हा त्याचा मित्र गौरव होगले याच्या मदतीने केला असल्याची कबुली पोलिसांनी दिली आहे. व चोरून आणलेले सायलेन्सर हडपसर येथील भंगार व्यावसायिक तसब्बूर मलिक याला विकला आहे असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सदर गुन्ह्यात त्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान, आरोपींनी यवत, सासवड, जेजुरी या परिसरातील एका मारुती सुझुकी कॅरी टेम्पोचा व तीन मारुती सुझुकी इको गाडीचे एकूण ४ गुन्हे केले असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. तसेच आरोपींकडून सदर गुन्हयातील २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दौंड प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी आरोपींना १० ऑक्टोबर पर्यंत पोलीस कस्टडीमध्ये रिमांड दिली आहे.
ही कारवाई यवत पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कृष्णा कानगुडे,निलेश कदम, गुरू गायकवाड, पोलीस नाईक अक्षय यादव,गणेश कुतवळ , सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सचिन गायकवाड,पोलीस मित्र निलेश चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.