सोलापूर : सोलापूर जिल्ह्यतील मंगळवेढा तालुक्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. न्यायालयासमोर खोटी माहिती देऊन खोटी कागदपत्रे हजर करून बाळू केराष्पा क्षीरसागर (वय ५२, रा. भाळवणी, ता. मंगळवेढा) हे जिवंत असताना त्यांचा मृत्यूचा दाखला देऊन न्यायालयाची दिशाभूल केली. याप्रकरणी महादेवी बाळू क्षीरसागर (वय ४५), नेहरू उर्फ रमेश शंकर सुरवसे (वय ५०), अंकुश शंकर सुरवसे (वय ४७), सोपान जगन्नाथ जाधव (वय ४५ रा. जित्ती) आणि ग्रामसेवक भारत नारायण चंदनशिवे या पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी बाळू क्षीरसागर हे जिवंत असताना वरील संशयित आरोपींनी न्यायालयात अर्ज क्र.३१०/२०२० मध्ये जबाबाचे शपथ पत्र देऊन फिर्यादी हा दि. १५ मार्च २०१५ रोजी जित्ती येथे मयत झाला असून आम्ही अंत्यविधीस हजर होतो. तसेच फिर्यादीचा मयताचा दाखला द्यावा असे शपथेवरती कोर्टात जबाब दिला होता. अशा रीतीने न्यायालयाची दिशाभूल करून कोर्टासमोर खोटी माहिती दिली. तसेच न्यायालयाची फसवणूक करून न्यायालयाचा आदेश मिळविला. ग्रामसेवक भारत चंदनशिवे यांनी दि.२२ फेब्रुवारी २०२१ रोजी रेकॉर्डला नोंद केली होती.
दरम्यान, सदर मृत्यू दाखल्याच्या आधारे फिर्यादीचे नावे असणारी जित्ती येथील घरजागा मालमत्ता क्र.१६४ व खवे येथील शेतजमीन गट नं.१२/२ च्या रेकॉर्डला फेरफार क्रमांक ११७५ ने संशयित आरोपी नं. १ महादेवी क्षीरसागर हिने फिर्यादी मयत असल्याने वारस म्हणून स्वतःच्या दोन मुली आणि एक मुलाचे नाव लावण्यात आले होते.