नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये कार्यरत असलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या या सक्रिय दहशतवाद्याला नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. रियाझ अहमद असे या दहशतवाद्याचे नाव आहे.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवाद्याने एलओसी ओलांडून शस्त्रे आणि दारूगोळा मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आरोपी हा निवृत्त सैनिक आहे. तो देशाच्या राजधानीत कोणत्या उद्देशाने आला होता, हेही कळू शकलेले नाही. सध्या पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.
खुर्शीद अहमद राथेर आणि गुलाम सरवर राथेर यांच्यासोबत एलओसी ओलांडून दहशतवादी हँडलर्सकडून शस्त्रे आणि दारूगोळा मिळवण्याचा कट रचण्यात त्याचा सहभाग होता. तो काश्मीरमधील कुपवाडा येथील रहिवासी आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला पहाटे नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून अटक केली. त्याच्याकडून एक मोबाईल फोन आणि एक सिमकार्ड जप्त करण्यात आले आहे.