पुणे : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जुन्या भांडणाच्या कारणावरुन लहान भावाने मोठा भाऊ आणि वहिनीच्या डोक्यात दगड घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना सध्या हडपसरमधील सह्याद्री हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. पत्नी बेशुद्धावस्थेत असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.
याबाबत लक्ष्मण किसन गायकवाड (वय ५०, रा. विठ्ठलवाडी, ता. इंदापूर) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी त्यांचा भाऊ महादेव गायकवाड (वय ४०), त्याची पत्नी लता गायकवाड (वय४०, रा. विठ्ठलवाडी, ता. इंदापूर) यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी लक्ष्मण आणि त्यांची पत्नी संगीता गायकवाड हे शेतात काम करत होते. त्यावेळी जुन्या भांडणाचे कारणावरुन त्यांचा भाऊ महादेव आणि त्याची पत्नी लता गायकवाड यांनी पत्नीला मारहाण केली. तसेच डोक्यात लोखंडी खोरे मारुन गंभीर जखमी केले. पत्नीचा आवाज ऐकून फिर्यादी तेथे गेल्यावर महादेव याने तू किती केस करतो ते कर अशी धमकी दिली.
त्यानंतर दगड उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारुन जबर जखमी केले. पत्नीच्या डोक्यात गंभीर जखम झाल्याने त्या जागीच बेशुद्ध पडल्या. त्यांना तातडीने पुण्यातील हडपसरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे अधिक तपास करत आहेत.