पुणे : कुटुंबासोबत शेतात हुरडा खाण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला अश्लील शिवीगाळ करुन, ‘तुम्ही या जागेतुन बाहेर व्हा, नाहीतर याठिकाणी रक्त सांडेल’, अशी धमकी दिली. तसेच शिवीगाळ करून, बंदूक रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत चंद्रकांत महादेव कुंजीर (वय-५१, रा. पारीजात सोसायटी, हडपसर) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अविनाश बापुसाहेब सातव, तुषार राजाराम म्हस्के, योगेश अशोक शिंत्रे, नवनाथ तुकाराम घुले, एकनाथ पिराजी उंद्रे, आव्हाळे (नाव पत्ता माहित नाही), एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना हवेली तालुक्यातील मौजे कोलवड येथील शेतात १ फेब्रुवारी रोजी रात्री आठच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुंजीर यांची कोलवडी येथे शेत जमीन आहे. फिर्यादी कुटुंबासमवेत गुरुवारी शेतात हुरडा खाण्यासाठी गेले होते. रात्री आठच्या सुमारास आरोपी त्याठिकाणी आले. त्यांनी कुंजीर यांना अश्लील शिवीगाळ केली. ‘तुम्ही या जागेतून बाहेर व्हा, नाहीतर याठिकाणी रक्त सांडेल’ अशी धमकी दिली. आरोपी योगेश शिंत्रे याने त्याच्याजवळील बंदूक फिर्यादीवर रोखून जीवे मारण्याची धमकी दिली. तर इतर आरोपींनी फिर्यादीच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की करुन शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.