संदीप टुले
केडगाव : गर्दीने गजबजलेल्या दौंड शहरातील रस्ते आणि चौकाचौकांत कित्येक वर्षांपासून केलेल्या अतिक्रमणांवर अखेर दौंड पोलिसांनी हातोडा चालवला आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केलेल्या या कारवाईमुळे शहरातील मुख्य ठिकाणांनी मोकळा श्वास घेतला आहे. दौंडकरांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.
दौंड शहरातील संविधान चौक, शिवाजी चौक, गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गांवरील रस्त्यालगत तसेच पदपथांवर असणाऱ्या छोट्या-मोठ्या विक्रेत्यांनी वर्षानुवर्षे अतिक्रमण केल्यामुळे शहराचा श्वास कोंडला होता. त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होऊन सर्वसामान्य नागरिक व वाहनचालकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत होता. गेली अनेक वर्षांपासून बेशिस्त वाहतूक, अवैध प्रकारे करण्यात आलेली अतिक्रमणे यामुळे शहराच्या सौंदर्याला बाधा निर्माण तर होतेच; तसेच याचा फटका सर्वांनाच बसतो. पोलीस निरीक्षक यादव यांनी हा उपक्रम हाती घेत स्वतः रस्त्यावर उतरून अतिक्रमणांवर हातोडा चालवला आहे.
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव सहायक फौजदार सुरेश चौधरी, सहायक फौजदार बबन जाधव, पोलीस हवालदार पांडुरंग थोरात, पोलीस कॉ. रवी काळे, योगेश पाटील, योगेश गोलांडे तसेच दौंड नगरपालिकेचे प्रकाश चलवादी, किशोर लांडगे, रणजीत भोसले, कैलास चलवादी, पंकज काळे आदींनी रस्त्यावरील अतिक्रमणे काढली.
अतिक्रमण करणाऱ्यांवर होणार कारवाई!
शहरातील मुख्य ठिकाणांवर करण्यात आलेली अतिक्रमणे काढल्याने वाहतुकीच्या कोंडीवर नियंत्रण मिळणार आहे. परंतु अतिक्रमणे काढलेल्या ठिकाणी पुन्हा कुणी अतिक्रमणे केली तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. याबाबत नागरिकांनी, व्यवसायिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.
– चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक, दौंड