कल्याण : मुंबईच्या उल्हासनगरमध्ये हिललाईन पोलीस ठाण्यातच भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून शिंदे गात शिवसेना नेते महेश गायकवाड याच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेनंतर प्रतिक्रिया दिली आहे. लोकप्रतिनिधींनी अशाप्रकारे कायदा हातात घेणं चांगलं नाही, यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करणार, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.
काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार बोलताना म्हणाले, उल्हासनगरमध्ये झालेली घटना ही आपण सर्वांनी पाहिली असून वैतागलेल्या माणसासारखा तो बोलत होता. संविधानाने आपल्याला जे अधिकार दिले आहेत, त्याचा कुठेही दुरुपयोग होणार नाही याची खबरदारी लोकप्रतिनिधींनी घ्यायला हवी. मात्र त्यांच्या बोलण्यात फार वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या आहेत.
रात्री उशिरा त्याबाबत आपल्याला माहिती मिळाली, वास्तविक कुणीही अशा पद्धतीने कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. सगळ्यांना नियम आणि कायदे हे सारखेच असतात. कुणाच्याबद्दल माझी काही तक्रार असेल तर मी ती पोलीस स्टेशनला देईल संबंधित घटनेबद्दल देखील आपण माहिती घेणार आहोत. याबाबत आपण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील बोलणार आहे.
आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक
ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात महेश गायकवाड यांच्यावर उपचार सुरु आहेत. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी महेश गायकवाड यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. दरम्यान कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली आहे. भाजपच्या गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या होत्या. सध्या महेश गायकवाड यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे.