कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघ महाविकास आघाडीत कळीचा मुद्दा झाला असतानाच आता महाविकास आघाडीने संभाजीराजेंच्या हालचालींवरून सूचक भाष्य केलं आहे. राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे महाविकास आघाडीत सहभागी झाले, तर त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांच्यासमोर एक अट असणार आहे. संभाजीराजे यांना महाविकास आघाडीच्या तीन प्रमुख घटक पक्षांपैकी एका पक्षात प्रवेश करावा लागणार आहे. संभाजीराजेंनी तीनपैकी एका पक्षात प्रवेश केल्यास संभाजीराजे यांची उमेदवारी निश्चित असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
संभाजीराजेंना सोबत घेण्याबाबत मविआत एकमत
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये संभाजीराजे छत्रपती यांना सोबत घेण्याबाबत एकमत झालेले आहे. पण, महाविकास आघाडीने यासाठी संभाजीराजे यांच्यापुढे ठेवलेली अट मोठी आहे. माजी खासदार संभाजीराजे महाविकास आघाडीच्या ऑफरवर काय भूमिका मांडतात ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. संभाजीराजे यांनी स्वत:चा स्वराज्य नावाचा पक्ष स्थापन केला आहे. तसेच ते यापूर्वीदेखील राज्यसभेचे खासदार होते. त्यांनी दीड वर्षांपूर्वी राज्यसभेच्या निवडणुकीवेळीदेखील शिवसेनेकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. पण, शिवसेनेकडून काही अटी घालण्यात आल्या होत्या. त्या अटी संभाजीराजे यांनी मान्य केल्या नव्हत्या.
संभाजीराजेंना आपला पक्ष विलीन करावा लागणार?
माजी खासदार संभाजीराजे यांनी आता महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटात, ठाकरे गटात किंवा काँग्रेसमध्ये जाहीर पक्षप्रवेश करत त्यांचा स्वराज्य पक्ष त्या पक्षात विलीन केला तर त्यांना उमेदवारी निश्चित मिळू शकते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. महाविकास आघाडीतील जे वरिष्ठ नेते आहेत त्यांचे देखील याबाबत एकमत झालेले आहे. संभाजीराजे यांना कोल्हापूरची जागा दिली जाऊ शकते, अशीदेखील माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी संभाजीराजे यांचे वडील छत्रपती शाहू महाराज यांचे नाव यासाठी चर्चेत होते. त्यांचे नाव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून कोल्हापूर लोकसभेच्या जागेसाठी चर्चेत होते. आता छत्रपती संभाजीराजे याबाबत काय भूमिका घेतात ते पाहणं आता महत्त्वाचे ठरणार आहे.