नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. २०४७ पर्यंत भारताला विकसित बनवण्याच्या संकल्पासह आमचे सरकार पुढे जात असून गेल्या चार वर्षांत तेजीने आर्थिक विकास झाला आहे. तसेच येत्या जुलैमध्ये विकसित भारताचा रोडमॅप सादर करणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. त्यांनी हंगामी अर्थ संकल्पात भारतीय रेल्वेसाठी तीन रेल्वे कॉरिडॉरची घोषणा केली.
भारतीय रेल्वेसाठी तीन स्वतंत्र कॉरिडॉर उभारणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. तसेच हे तीन कॉरिडॉर ऊर्जा, खनिज आणि सीमेंट यांसाठी स्वतंत्ररित्या बनवण्यात येणार आहेत. पीएम गति-शक्ति योजनेवर भर देण्यात येणार आहे. तसेच डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमुळे विकासदर वाढण्यासाठी मदत मिळू शकेल. या स्वतंत्र मार्गिकांमुळे मालवाहतूक सुलभ होणार असून प्रवासी वाहतुकीलाही याचा फायदा होईल, असा विश्वास निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला.
दरम्यान भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेवर तसेच सोयी-सुविधांवर भर देण्यात येणार असून, त्या वाढवण्यावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. तसेच रेल्वेचे चाळीस हजार सामान्य डबे आता वंदे भारतच्या धर्तीवर विकसित होणार आहेत. यामुळे सुरक्षितता आणि सुलभता आणखी अद्ययावत होऊ शकेल, असे सीतारामन यांनी सांगितले. दरम्यान, मेट्रो आणि नमो भारत या सेवांचा देखील विस्तार करण्यात येणार आहे. मोठ्या शहरांमध्ये मेट्रो आणि नमो भारत सेवा पोहोचवण्यावर भर दिला जाणार आहे. या प्रवासी ट्रेनच्या संचालनात सुधारणा केल्याने प्रवासाचा वेग वाढेल आणि सुरक्षित प्रवासाचा एक उत्तम पर्याय देता येईल, असे निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले आहे.