यवत: जप्त मुद्देमाल वाहन विक्री प्रकरणात लोणी काळभोर (ता. हवेली) पोलीस ठाण्यातील चार पोलिसांच्या निलंबनाच्या धक्क्यातून पुणे शहर पोलीस दल सावरत असतानाच, जिल्हा (ग्रामीण) पोलीस दलात असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने पोलीस दलात पुन्हा खळबळ उडाली आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत एका चोरीच्या गुन्ह्यात जप्त केलेली दुचाकी न्यायालयीन आदेशानुसार मूळ मालकाला परत देण्याचे आदेश असतानाही, यवत पोलिसांनी मात्र सदर दुचाकी मूळ मालकाला परत देण्यासाठी मागील 25 दिवसांपासून टाळाटाळ करत आहेत. याबाबत पोलिसांकडे विचारणा केली असता, सदर दुचाकी गहाळ झाल्याचे सांगत दुचाकी मालकाला परत पाठविले जात आहे. लोणी काळभोर पोलिसांचा मुद्देमाल विक्रीबाबत अनुभव लक्षात घेता संबंधित दुचाकी गहाळ झाली की, लोणी काळभोर पोलिसांप्रमाणे यवत पोलिसांनीही जप्त केलेल्या दुचाकीची परस्पर विक्री केली, असा संशय निर्माण झाला आहे.
जेरीचंद तुळजीराम गवळी (वय-47, रा. खामगाव, ता. दौंड) हे यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गहाळ झालेल्या दुचाकी मालकाचे नाव आहे. ते मागील 25 दिवसांपासून न्यायालयीन आदेश घेऊन दुचाकी मिळावी, यासाठी यवत पोलीस ठाण्यात हेलपाटे मारीत आहेत.
‘पुणे प्राईम न्यूज’ला मिळालेल्या माहितीनुसार, अदित्य हरीभाऊ शिनणकर (वय-22 रा.उंडवडी, भोसलेवाडी, ता. दौंड) यांच्या दोन बकरी चोरी झाल्याची घटना 15 एप्रिल 2022 मध्ये घडली होती. याप्रकरणी शिनणकर यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणात यवत पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत त्याच्याजवळ असलेल्या दुचाकीसह मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. याप्रकरणी फिर्यादी यांनी दुचाकी मिळावी यासाठी दौंड न्यायालयात अर्ज केला होता. त्यानंतर या खटल्याचा निकाल फिर्यादी यांच्या बाजूने लागला. न्यायालयाने फिर्यादी यांना जप्त करण्यात आलेली दुचाकी परत देण्याचे आदेश 6 जानेवारी 2024 रोजी दिले आहेत.
न्यायालयाच्या आदेशानुसार फिर्यादीने यवत पोलीस ठाणे गाठले असता, त्यांना पोलीस ठाण्याच्या आवारात दुचाकी न आढळल्याने धक्का बसला. याबाबत पोलिसांनी फिर्यादींना यवत ते पाटस असे दुचाकी शोधण्यासाठी फेऱ्या मारायला लावल्या. मात्र, दोन्हीही ठिकाणी त्यांची दुचाकी आढळून आली नाही. यामुळे फिर्यादी यांना वेगळा संशय आल्याने त्यांनी दोन्ही ठिकाणी सातत्याने पाठपुरावा केला. फिर्यादी वारंवार येत असल्याने यवत पोलिसांनी त्यांना वेळोवेळी उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे शेवटचा आशेचा किरण म्हणून फिर्यादी यांनी कागदपत्रांच्या पुराव्यासह ‘पुणे प्राईम न्यूज’चे कार्यालय गाठत कैफियत मांडली.
नुकतेच लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील उरुळी कांचन पोलीस चौकीत (सध्या उरुळी कांचन ग्रामीण पोलीस ठाणे) जप्त केलेल्या वाहनांची परस्पर विल्हेवाट लावल्याची बातमी ‘पुणे प्राईम न्यूज’ने प्रकाशित केल्यानंतर चार पोलिसांच्या निलंबनाची कारवाई झाली. या कारवाईची घटना ताजी असल्याने , यवत पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात जप्त केलेली दुचाकी ठाण्याच्या आवारातून गहाळ झाल्याची तक्रार दाखल करून सेफ गेम खेळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी झिरो पोलिसाच्या मदतीने दुचाकी गाड्या विकल्याने नागरिकांचा पोलिसांकडे पाहण्याचा कल बदलला आहे. त्यामुळे यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी गहाळ झाली की, तिची संगनमताने परस्पर विक्री केली गेली? याविषयी नागरिकांमध्ये जोरदार चर्चा सुरु असून या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी करावी. तसेच यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गुन्ह्यांमध्ये किती दुचाकी व चारचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. त्यातील किती गाड्या गहाळ आहेत. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिकांनी ‘पुणे प्राईम न्यूज’कडे केली आहे.
मी शेतात मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितो. काम सोपे व्हावे म्हणून दुचाकी हप्त्यावर घेतली आहे. गाडी घेतल्यानंतर एका महिन्याच्या आतच, एका गुन्ह्यात माझी दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. गेल्या दीड वर्षापासून मी गाडीचे हप्ते न चुकता भरले आहेत आणि गाडी सोडावी असे आदेशही न्यायालयाने दिलेले आहेत. मात्र, मागील 25 दिवसांपासून पोलीस गाडी देत नसल्याने या पाठीमागे काहीतरी पोलिसांचे गौडबंगाल आहे. पोलिसांनी माझ्या सारख्या गरिबाला त्रास न देता लवकर गाडी द्यावी.
-जेरीचंद गवळी (दुचाकी मालक)
नागरिकांना आवाहन
पूर्वहवेलीसह आसपासच्या परिसरातील जप्त दुचाकी, चारचाकी गाड्या पोलिसांकडून गहाळ झाल्या असतील आणि पोलीस त्याची माहिती देत नसतील तर नागरिकांनी ‘पुणे प्राईम न्यूज’च्या punepeimenews@gmail. या इमेल आयडीवर आपल्या तक्रारी पाठवाव्यात. या तक्रारींची शहानिशा करून प्रसिद्धीही दिली जाईल.