पुणे : पंकजा मुंडेंच्या भगवान गडावरील मेळाव्यानंतर गोंधळ उडाला आहे. मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाल्यानं पोलिसांनी यावेळी लाठीचार्जही केला आहे. पंकजा मुंडेंच्या भाषणाच्या सुरुवातीलाही काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता.
बीड जिल्ह्यातील राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या सावरगाव घाट गावात पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्याला पंकजा मुंडे यांच्यासह खासदार प्रितम मुंडे, यशश्री मुंडे , महादेव जानकर, आमदार मेघना बोर्डीकर, शिवाजीराव कर्डिले याच्यासह अनेक नेते उपस्थित होते. पंकजा मुंडेंच्या आधी महादेव जानकर आणि प्रितम मुंडे यांची भाषणे झाली.
पंकजा मुंडे या भाषणासाठी व्यासपीठावर दाखल झाल्या त्यानंतरही काही हुल्लडबाज तरुणांनी पोलिसांशी हुज्जत घालत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पंकजा मुंडेंनी या कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुनच शांत राहण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर हा गोंधळ थांबला.
पण जेव्हा पंकजा मुंडेंचं भाषण संपलं आणि त्या व्यासपीठावरुन खाली उतरुन आपल्या ताफ्याकडे गेल्या त्यानंतर तरुणांची गर्दी ही व्यासपीठाच्या दिशेने जाऊ लागली. यावेळी समर्थक कार्यकर्त्यांना बाजूला होण्याचं आवाहन पोलीस करत होते. पण प्रचंड गर्दी झाल्यानं कोणीही बाजूला हटत नव्हतं. अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आणि त्यानंतर ही गर्दी पांगली.
दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या भाषणानंतर मेळाव्याच्या ठिकाणी पोलीस आणि भाजप समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाची मुळे तिथे एक गोंधळ उडाला. या गोंधळादरम्यान काही नेते व्यासपीठावरच अडकले होते. यावेळी व्यासपीठावरुन पोलीस विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.