पुणे : पुण्यात पर्वती दर्शन परिसरात टोळक्याने दहशत माजवून वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. तसेच टोळक्याने एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार देखील केले आहेत. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, दोन्ही गटातील १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सीता नितीन शेंडगे (वय ३३, रा. शिवराज मित्र मंडळाजवळ, पर्वती दर्शन) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अल्पवयीन मुलासह श्री देवेंद्र, अजय चव्हाण, सोन्या गेजगे, शुभम अडागळे याच्यासह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २ दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलाचा शेंडगे यांचा पुतण्या अथर्व याच्याशी वाद झाला होता.
मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अल्पवयीन मुलगा देवेंद्र, चव्हाण, अडागळे आणि साथीदार शिवराज मित्र मंडळाजवळ आले. त्यांनी कोयते उगारून परिसरात दहशत माजविली. तसेच अथर्व याच्या डोक्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. अथर्वने वार चुकवून घरात गेला. त्यानंतर घराच्या दरवाजावर कोयता आपटून आरोपींनी शिवीगाळ केली. परिसरातील दुचाकी, टेम्पो, रिक्षांच्या काचा फोडून बिअरची ब्बातल्या रस्त्यात फोडल्या, असं शेडगे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक मुळीक अधिक तपास करत आहेत.
पर्वती पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार
दरम्यान, अल्पवयीन मुलाला बांबूने बेदम मारहाण केल्याप्रकरणी परस्परविरोधी तक्रार पर्वती पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. याबाबत अल्पवयीन मुलाने फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, अथर्व प्रदीप शेंडगे (वय १९), निलेश अशोक चंदनशिवे, राजरतन सुनील गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचे साथीदार कृष्णा देवेंद्र, आफन शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे करत आहेत.