पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग) हायवे ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टिमअंतर्गत पुणे मार्गावर कि.मी. ६३.००० येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. यामुळे या महामार्गावर मंगळवारी आज दोन तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. या कामामुळे वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत ३० जानेवारी रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत गॅन्ट्री बसविण्याचे काम होणार आहे. यादरम्यान पुण्याकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने (हलकी तसेच जड-अवजड वाहने) यांची वाहतूक बंद करण्यात येणार आहे. वाहनधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येणार आहे.
मुंबईहून पुण्याकडे जाणारी हलकी वाहने कि.मी. ५४.४०० वेथून कुसगाव टोलनाका येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुना मुंबई-पुणे महामार्गावरील पुणे मार्गावर जाणार आहेत, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.