करमाळा : करमाळा तालुक्यात पश्चिम भागातील जिल्हा परिषद अंतर्गत रस्त्यांची कामे अत्यंत नित्कृष्ठ दर्जाची होत असल्याचे समोर आले आहे. त्याविरोधात उपअभियंता रस्ते बांधकाम विभाग करमाळा यांना कामाची सखोल चौकशी करण्याचे निवेदन देण्यात आले. संबंधित कामाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे उप अभियंतांकडून सांगण्यात आले आहे.
घरत वाडी ते कुंभारगाव, कोर्टी ते हुलगेवाडी व दिवेगव्हाण ते कुंभारगाव या डांबरी रस्त्यांचे जिल्हा परिषद अंतर्गत काम सुरू आहे. त्यात, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. ठरलेल्या प्रमाणापेक्षा निम्याहून कमी डांबर रसत्यावर टाकण्यात आले आहे. वारंवार ठेकेदारांना सांगूनही कामाच्या दर्जामध्ये कोणती सुधारणा झालेली नाही. तिन्ही रस्त्याचे डांबरीचे काम निविदेप्रमाणे न होता लवकर आटपून घेण्याचा ठेकेदाराचा घाट आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी कोणतेही शाखा अभियंता उपस्थित नसतानाही ठेकेदाराने घाई घाईने सील कोट गडबडीने उरकून घेतला.
सुचनेप्रमाणे जेवढ्या प्रमाणामध्ये डांबर रस्त्यावरती पडायला पाहिजे होते. त्याच्या निम्म्यापेक्षाही कमी प्रमाणामध्ये डांबर टाकण्यात आले आहे. कोर्टी ते हुलगेवाडी रस्त्याचे डांबर हातानेही निघत आहे. घरतवाडी – कुंभारगाव तसेच दिवेगव्हाण- कुंभारगाव या रस्त्याची हीच अवस्था आहे. निकृष्ट दर्जाच्या कामाचा आटपण्याचा घाट घरतवाडी ग्रामस्थ सागर घरत यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ताबडतोब उपअभियंता रस्ते बांधकाम विभाग करमाळा यांना संपूर्ण कामाची सखोल चौकशी करण्याचे निवेदन दिले.
त्यावर, उप अभियंत्यांकडून सूचना जारी करण्यात आली आहे. संपूर्ण कामाची चौकशी होईपर्यंत संबंधित ठेकेदाराचे कोणतेही बिल काढण्यात येऊ नये, अशी सूचना करण्यात आली आहे. संबंधित अधिकारी काय कार्यवाही करतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
संबंधित कामावरती जाऊन कामाची व त्याच्या दर्जाची पाहणी व चौकशी करण्यात येईल. संबंधित ठेकेदारावरती योग्य ती कारवाई करण्यात येईल.
-श्री. बबन गायकवाड (उप अभियंता करमाळा)