कोल्हापूर : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता कुणबी नोंदी असणाऱ्या व्यक्तींच्या सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयाला ओबीसीमधून मोठा विरोध होताना दिसत आहे. याला मंत्री छगन भुजबळ यांनीही विरोध दर्शिविला आहे.
यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकाच घरातील दोन भावांमध्ये मतभेद असतात, घरातील सर्वजण एकत्रित बसून चर्चा करून मार्ग काढत असतात, असे अजित पवार म्हणाले. म्हणत चर्चेतून प्रश्न सुटतो असं वक्तव्य केलं आहे. कोल्हापूर दौऱ्यावर असताना ते बोलत होते.
राज्याचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदेचा निर्णय
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, प्रत्येकाची वेगवेगळी मते असू शकतात. वेगळे विचार असू शकतात, प्रत्येकाची पध्दत वेगळी असते. त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षणाबाबत त्यांनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मी कोणालाही धक्का न लावता यातून मार्ग काढेन असं त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. अशातच घरात दोन भाऊ असतात त्यांच्यामध्ये देखील अनेक मतभेद असतात. घरातील सदस्य एकत्रित बसतात आणि त्यामध्ये काही समज गैरसमज असतील ते दूर करतात, असही अजित पवार म्हणाले.
मुंबईत छगन भुजबळांशी बोलू
पुढे बोलताना ते म्हणाले देवेंद्र फडणवीस देखील म्हणाले आहेत, आम्ही मुंबईत छगन भुजबळ यांचीशी बोलू. यामध्ये कोणावर अन्याय झाला असं वाटतं नाही. मात्र, त्यांचे काही प्रश्न असतील तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू, आम्हाला छगन भुजबळांशी बोलण्यासाठी थोडासा तरी वेळ द्या आम्ही त्यांच्याशी बोलू असंही अजित पवारांन म्हणाले.
वाचाळवीरांच्या प्रश्नाला उत्तर देण्यास मी बांधील नाही : अजित पवार
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला फसवल्याची टीका केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांना विरोध करणारा मंत्री बरखास्त करा, असेही त्यांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाचाळवीर लोकांच्या प्रश्नाला उत्तर देण्यास मी बांधील नाही, सरकारची कोणतीही मिलीभगत नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात. असंही अजित पवार म्हणाले.