पुणे : मराठा आरक्षणावरील राज्य सरकारच्या निर्णयावर मागासवर्गीय आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाकेंनी प्रचंड संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांना चर्चेचे खुले आव्हान देत त्यांच्यावर जहरी टीका केली आहे. मनोज जरांगे यांची औकात नाही, लायकी नाही औकात असेल तर महाराष्ट्राचे सामाजिक न्यायाचे धोरण समजून घ्या. त्यासाठी जरांगे यांनी त्यांच्या लोकांना घेऊन कुठल्याही मीडियाच्या चॅनेल समोर प्रतिवाद करायला यावे, असे आव्हान लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांना दिले.
काय म्हणाले लक्ष्मण हाके
मराठा आरक्षणाच्या अध्यादेशानंतर ओबीसी आणि व्हिजीएनटी समाज प्रचंड नाराज झाला आहे. आम्हाला डावलल जात आहे. बेदखल केले जात आहे. हाच फुले शाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे का? असा सवालही लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
शिवाजी महाराजांचे नाव घेता…
छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रातील रयत अशी अपेक्षित होती का? छत्रपतींचे उटसूट नाव घेता आणि ओबीसी समाजातील माणसांच्या न्यायहक्कांच्या विरोधात मुख्यमंत्री रात्री, अपरात्री अध्यादेश काढतात. राज्यातील ओबीसी समाजातील लोकांना हे अजिबात आवडलेले नाही. मनोज जरांगे यांना या महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांची रयत समजून घ्येयाची असेल, महाराष्ट्राचा पुरोगामी विचार समजून घ्यायचा असेल, महाराष्ट्राचे सामाजिक न्यायाचे धोरण समजून घ्यायचे असेल, तर चर्चेला या. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचा प्रतिवाद करायला आम्ही तयार आहोत.