नवी मुंबई : राज्यात मराठी भाषेचा दर्जा घसरत असल्याचे पाहून सरकार वेगवेगळे उपाय करत आहे. आता या पार्श्वभूमीवर उच्च आणि तंत्रशिक्षण विभागातील इंजिनीअरिंगमध्येही मराठी सक्तीची करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शालेय शिक्षण विभागाने हा मोठा निर्णय घेतला आहे. विश्व मराठी संमेलनात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत घोषणा केली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेदेखील उपस्थित होते.
याआधीही राज्यातील पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळांना मराठी सक्ती करण्यात आली आहे. यावेळी केसरकर यांनी राज ठाकरेंची स्तुती केली. राज ठाकरे यांचे भाषण आणि वक्तृत्व सर्वांसाठी आकर्षण असते. आम्ही कुठल्याही राजकारणी व्यक्तीला संमेलनासाठी बोलावले नाही. मात्र आपण बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा जपला आहे. त्यामुळे आम्ही आपल्याला बोलावलं असल्याचे दीपक केसरकर राज ठाकरेंना उद्देशून म्हणाले.
यावेळी मंचावरुन राज ठाकरे यांनीदेखील आपले विचार मांडले. मी कडवट मराठी आहे. माझ्यावर तसे संस्कार झाले आहेत. मराठी विषयावर आंदोलन केली, केसेस झाल्या, तुरुंगात गेलो. जून महिन्यात अमेरिकेत मला महाराष्ट्र मंडळानी निमंत्रित केले आहे. महाराष्ट्रातील मराठी शाळा बंद होत असताना अमेरिकेत मराठी शाळा उघडतात हे काय कमी आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना विचारला.