पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. मित्रांसोबत पोहायला गेलेल्या ८ वर्षीय चिमुकल्याचा पवना नदी पात्रात बुडून मृत्यू झाला आहे. पिंपरीगाव येथील बोट क्लबजवळ २६ जानेवारीला दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. विशाल भीम थापा (८, रा. इंद्रायणीनगर, डिलक्स चौक, पिंपरी, मूळ रा. नेपाळ), असं बुडालेल्या मुलाचं नाव आहे.
याबाबत वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गणेश जवादवाड यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, विशाल हा त्याच्या काही मित्रांसोबत पवना नदीत पोहायला गेला होता. त्यावेळी पाण्याचा अंदाज न लागल्यान तो बुडाला. या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा शोध सुरु होता. मात्र, अंधार झाल्याने शोधकार्य थांबवण्यात आले होते. रविवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात येणार आहे.
विशाल याचे वडील भीम काशीराम थापा हे एका हॉटेलमध्ये काम करतात. तर त्याची आई मीना थापा मजुरीचे काम करते. तसेच विशाल याला एक ४ वर्षीय भाऊ आहे. मूळचे नेपाळ येथील असलेल्या भीम थापा यांनी त्यांच्या २ मुलांना आणि पत्नीला दोन महिन्यांपूर्वी नेपाळ येथून पिंपरी येथे आणले होते.