पुणे : सरकारने जादूटोणाविरोधी कायदा कडक केलेला असला, तरी जादूटोण्यासारखे अघोरी कृत्य करुन एका व्यावसायिकाची तब्बल २ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक करण्याच्या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांनी महिलेचा जामीन अर्ज फेटाळला. हा प्रकार ऑगस्ट २०२० ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत पुण्यातील रास्ता पेठ परिसरात घडला होता.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रोया उर्फ सीमा नादीर नईमा आबादी (वय ३५, रा. कॅम्प) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी भारतीय तसेच परदेशी नागरिक आहे. तिला जामीन मिळाल्यास ती भारतातून इराण किंवा इतर देशांमध्ये पळून जाण्याची शक्यता आहे. पुराव्याशी छेडछाड करणे आणि इतर फरार आरोपींना पळून जाण्यास मदत करण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुन्ह्याचे गंभीर स्वरुप लक्षात घेता आरोपीला जामीन मंजूर करता येत नसल्याचे कारण देत न्यायालयाने तिचा जामीन फेटाळून लावला.
याप्रकरणी शेख अब्दुल बासित अब्दुल लतिफ (वय ४५, रा. कोंढवा खुर्द) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नादीर अब्दुल हुसैन हसन अली नईमा आबादी (रा. सिनागग ईस्ट्रीट, कॅम्प), रोया उर्फ सीमा नादीर नईमा आबादी (वय ३५, रा. कॅम्प), मौलाना शोऐब मैनुद्दीन आत्तार (रा. बोपोडी), माजीद उस्मान आत्तार (रा. बोपोडी), खालीद मैनुद्दीन आत्तार (रा. बोपोडी), इरम शोऐब आत्तार (रा. बोपोडी) यांच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी मौलाना शोएब व नादीर हे बांधकाम व्यावसायिक आहेत. आरोपींनी संगनमत करुन त्यांचा कोणताही इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसाय नसताना या व्यवसायात पैसे गुंतवल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष फिर्यादी यांना दाखवले. त्यावर विश्वास ठेवून शेख यांनी वेळोवेळी त्यांच्याकडे २ कोटी ४० लाख रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर आरोपींनी कोणताही परतावा न देता फसवणूक केली होती. याप्रमाणेच या आरोपींनी आणखी तिघांची फसवणूक केल्याचे गुन्हे गेल्या ४ महिन्यांमध्ये तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत दाखल झाले होते. या चार गुन्ह्यांमध्ये एकूण ६ कोटी २३ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.