युनूस तांबोळी
आपणच आपल्या कॅमेऱ्याने ‘सेल्फी’ काढताना कसलेच भान न बाळगणारे अखेर आपल्या जीवाला मुकले आहेत. हे सेल्फी वेड अख्ख्या जगाला असले तरी भारतात त्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे, हे ऐकून आश्चर्य वाटेल. सेल्फीतून निघणारी छबी हेच आपले अंतिम छायाचित्र ठरू नये, याची जाणीव करण्याची वेळ आली आहे…
आजकाल तरुणाईच्या हातात अॅडव्हान्स मोबाईल आले आहेत. या मोबाईलमध्ये केवळ संपर्काचीच नव्हे तर उत्तम फोटो काढण्याचीही सोय असते. हातातल्या या कॉम्पॅक्ट मोबाइल कॅमेरॅने फोटो काढण्याची आपली हौस आपण न पुरवू, तरच नवल! मग कोणाच्या कॅमेऱ्यातून चांगला फोटो निघतो, याची चढाओढही लागते. अशा कॅमेऱ्यातून वाटेल तिथे, हव्या त्या बॅकग्राऊण्डसह एकट्याचा किंवा मग अगदी मित्र-मैत्रिणींसोबत फोटो काढण्याच्या नादात आजवर अनेकांनी आपले जीव गमावले आहेत, हे वास्तव मात्र नाकारून चालणार नाही.
सेल्फीसाठी चुकीच्या ठिकाणांचा वापर
सेल्फी घेण्यातून अनेकांना आनंद मिळतो. अनेकदा सिलेब्रेटी अथवा राजकीय नेत्यांची छबी आपल्यासोबत असावी यासाठी तरूण सेल्फी घेतात. या सेल्फीतून मिळणारी छबी इन्स्ट्राग्राम, फेसबूक अशा अनेक सोशल मिडिया अकाऊंटसाठी वापरात आणली जाते. मात्र, सेल्फी काढण्यासाठी ही तरुणाई अनेकवेळा चुकीच्या ठिकाणांचा वापर करते. त्यामुळे दुर्घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर पूर्वापार चालत आलेली स्वतःचे छायाचित्र टीपण्याची क्रेझ पुन्हा एकदा भूतकाळात घेऊन जाते.
‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’चा जमाना
‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’च्या जमान्यात फोटोग्राफीच्या कलेला आगळे महत्त्व होते. यात्रा, जत्रा, सण, समारंभात आपल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी गौरव अथवा समारंभाचे काढलेले कलात्मक छायाचित्र हा एक जतन करणारा ठेवा असतो. यामध्ये जो-तो आपली छबी कशी दिसते, याकडे लक्ष ठेवून असतो. त्यातून फोटोग्राफीला चांगले दिवस आले. त्यानंतर रंगीत फोटोचा जमाना आला. अनेक ठिकाणी या छायाचित्रांचा वापर कागदपत्रांच्या पुर्ततेसाठी होऊ लागला. त्यामुळे फोटोग्राफी ही कला व्यावसायिक पातळीवर पोहोचली. कार्यक्रमांमध्ये काढलेल्या छायाचित्रांतून चांगला व्यवसाय होऊ लागला. या व्यवसायाचे महत्त्व वाढून लग्न समारंभात छायाचित्राची कला चांगला पैसा मिळवून देऊ लागली. करीझ्मा, फोटोबूक सारखे फोटोचे अलबम सध्या बाजारात उपलब्ध झाले असून, या व्यवसायात नावलौकीक कमविणारे अनेक फोटोग्राफर पहायला मिळतात.
आधुनिक कॅमेरा फोटोग्राफी
वेगवेगळ्या कॅमेऱ्यातून फोटोग्राफी करण्याची यंत्रणा जुन्या काळापासून प्रचलित आहे. जुन्या काळात निगेटिव्ह तयार करून नंतर फोटो काढण्याची पद्धत होती. त्यासाठी असणारे कॅमेरे देखील त्याच पद्धतीचे होते. या कलेला राजाश्रय देखील मिळत होता. त्यानंतर जाणकारांनी देखील या कलेला चांगला दर्जा मिळवून दिला. त्यामुळे जुन्या काळातील दुर्मिळ छायाचित्रे आजही संग्रहित असल्याचे पहायला मिळतात. ‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’च्या जमान्यानंतर रंगीत फोटो काढण्याची कला अवगत झाली. त्या पद्धतीचे कॅमेरे व यंत्रणा प्रचलित झाली. त्यामुळे रंगीत फोटोग्राफीचा व्यवसाय देखील भरभराटीला आला. या काळात देखील निगेटिव्हनंतर फोटो अशीच छायाचित्राची पद्धत होती. फोटोग्राफी व्यवसायात क्रांती झाली आणि निगेटिव्ह तयार करण्याची पद्धत संपुष्टात आली. फोटोग्राफीच्या विश्वात डिजीटल कॅमेऱ्याचे आगमन झाले. यामध्ये तुम्हाला हवे असेल अशी छबी येईपर्यंत फोटो काढण्याची पद्धत आली. नको असेल ते डिलीट करण्याच्या या पद्धतीचा उगम झाला. त्यामुळे सध्या वेगवेगळ्या छायाचित्रांच्या कॅमेऱ्यामधून हवे तसे फोटो काढता येऊ लागले आहे.
सेल्फीची क्रेझ
भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल हाती आल्यानंतर फोटोग्राफीच्या विश्वात देखील क्रांती झाल्याचे पहायला मिळते. यातून कलात्मक फोटोग्राफी करणाऱ्या व्यवसायिकांना देखील तोटा झाला. संदेशवहनाबरोबरच मोबाईलमधील छायाचित्रणांच्या सुविधेमुळे प्रत्येकाला फोटोबाबत वेगळे आकर्षण निर्माण झाले. या छायाचित्रात आपला फोटो काढण्याची सुविधा असल्याने प्रत्येकाला मोबाईलमधील सेल्फीबाबतचे आकर्षण वाढत गेले. त्यातून समारंभात आपल्यासोबत इतरांचे छायाचित्र या पद्धतीला अधिक महत्व दिले जात असल्याचे पहावयास मिळते. मोबाईलमधील या फोटोग्राफीने क्रांती केली असून, पर्यटनाच्या ठिकाणी सेल्फी काढणारे मोबाईल दिसून येतात.
सेल्फीच्या नादात दुर्घटना
मोबाईलमध्ये सेल्फी काढण्याच्या नादात गड, किल्ल्यांवर पर्यटन करणारे सेल्फीच्या आहारी जाताना दिसून येतात. आपण कोणत्या अवघड ठिकाणी आहोत, याचे भान न ठवता फोटो काढले जातात. यामुळे तोल जाऊन खोल दरीत पडण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. नुकतेच पानशेत धरणाच्या सांडव्याच्या पाण्यात उतरून सेल्फी काढताना बुडणाऱ्या बहिणींना वाचवताना भावाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. अशा अनेक घटना या सेल्फी काढताना घेतलेल्या निष्काळजीपणामुळे होत आहेत. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. निष्काळीपणा जीवावर बेतू शकतो. सेल्फीमध्ये दिसणारी तुमची छबी ही अंतिम छपीदेखील ठरू शकते. तरुणांनो, स्वतःची काळजी घ्या, तुमचे जीवन अनमोल आहे.