वाघोली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे-पाटील यांचा मोर्चा आज पुण्यात दाखल होत आहे. हा मोर्चा आंतरवली सराटी येथून मुंबईकडे मार्गस्थ झाला आहे. मोर्चा आता पुणे येथील खराडीत येणार असून, याठिकाणी मुक्काम होत आहे. वाघोलीतील केसनंद फाट्यावर मोर्चाचे उत्साहात स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर ते चोखीधानी रोडवरील मैदानात मुक्कामी जाणार आहेत. त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांच्या जेवणाच्या व्यवस्थेसाठी वाघोली व परिसरात सकाळपासूनच चुली पेटलेल्या दिसत आहेत.
कोरेगाव भीमा येथील दुपारच्या जेवणानंतर ते वाघोलीकडे प्रस्थान करणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी नागरिक सायंकाळी पाच वाजता केसनंद फाट्यावर जमा होणार आहेत. त्यांच्यासोबत हजारो कार्यकर्ते असल्याने त्यांच्या जेवणाच्या व्यवस्थेसाठी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते सकाळपासूनच तयारीला लागले आहेत. भाकरी व भाजी बनविण्यासाठी सकाळपासूनच चुली पेटल्या आहेत.
दरम्यान, ज्या घरातून भाकरी, भाजी बनविल्या जातील त्या जमा करून मुक्कामाच्या ठिकाणी पोहचविण्यात येणार आहेत. पाणी, तात्पुरती स्वच्छतागृहे, आरोग्य व्यवस्था करण्याचे काम मैदानात युद्धपातळीवर सुरू आहे. जी मदत देणे शक्य आहे. ती मदत नागरिक देत आहेत.
वाघोलीचे उपसरपंच राजेंद्र सातव व त्यांच्या पत्नी जयश्री सातव यांनी १५ हजार भाकरी बनविण्यासाठी आपल्या घराजवळ सकाळपासूनच चुली पेटविल्या आहेत. भाकरी बनविण्याचे काम परिसरातील महिलांना देण्यात आले आहे.