लोणी काळभोर, ता.21 : उरुळी देवाची (ता.हवेली) येथील मंडल अधिकारी व वडकी तलाठी कार्यालयाचा तब्बल 111 फेरफारांचा ‘प्रलंबित’ कारभार नुकताच चव्हाट्यावर आला आहे. नवनियुक्त मंडल अधिकारी मनीषा भोंगळे यांच्या कार्यक्षेत्रातील एकाच गावात शंभरहून अधिक फेरफार नोंदी प्रलंबित असलेल्या दिसून येत आहेत.
नागरिकांची कामे विनाविलंब व तात्काळ होण्यासाठी राज्य शासनाने नवीन तलाठी व सर्कल कार्यालयाची निर्मिती केली आहे. मात्र, हवेली वरिष्ठ कार्यालयातील संबंधित अधिकारी प्रलंबित कारभाराकडे दुर्लक्ष करत असल्याने शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार सर्रासपणे वाढू लागला आहे. त्यामुळे नवीन सजाची निर्मिती होऊनही महसूली कामाला ‘विलंबाची खुटी’ मारण्याचा प्रकार हवेलीत सुरूच असल्याने नवीन तलाठी व सर्कल कार्यालये होऊन उपयोग काय? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
वडकी (ता. हवेली) येथील गावातील खरेदीखताच्या नोंदीसह इतर दस्तावेजचे तब्बल 111 फेरफार प्रलंबित असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. बँक बोजा, वारस नोंदी, खरेदीखत नोंदी, हक्क सोड पत्र नोंदी, आदेश नोंदी, बक्षिसपत्र नोंदी व इतर फेरफारांच्या नोंदींचा यामध्ये समावेश आहे. फेरफार नोंदी उशिरा घेणे, त्याबाबतचा हरकतीचा शेरा भरण्याचे काम ताटकळत ठेवले जाते. त्यानतंर सर्कल स्तरावर प्रोटोकॉलनुसार नोंदी निर्गत करण्यासाठी पुर्वावलोकन योग्य दिसून येत नाही व फेरफारचा योग्य अमंल दिसून येत नाही, असा तांत्रिक अडचणींचा काही ठिकाणी व्हायरस तयार होत आहे. अशी ऑनलाईन ई म्युटेशन फेरफारची तलाठी व सर्कल पातळीवर ‘गंमत जंमत’ सुरू आहे.
वडकीच्या तलाठ्यांकडे अन्य गावचा अतिरिक्त पदभार असूनही कामकाजाचे दिवस व वेळ याचा त्यांनी फलक लावलेला नाही. यामुळे नागरिकांना तलाठी भाऊसाहेब वडकी येथील कार्यालयात कधी उपस्थित असतात व अन्य ठिकाणी कधी? याचा थांगपत्ता लागत नसल्याने नागरिक तलाठ्यांच्या भेटीसाठी हेलपाटे मारत आहेत.
वरिष्ठांच्या अळीमिळी गुपचिळी धोरणांमुळे तलाठी व मंडलाधिकारी सेफ
गावागावांतील महसूली सजा कार्यालयातील भ्रष्ट कारभार कमी करुन कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी राज्य शासनाने ई म्युटेशन प्रणाली विकसित केली आहे. शासनाच्या ऑनलाईन धोरणांमुळे रजिस्टर कार्यालयात नोंदवलेला दस्त ई म्युटेशनमुळे डायरेक्ट संबंधित तलाठ्यांच्या डॅश बोर्डला येत असतो. परंतु, हवेली तालुक्यात बहुतांशी तलाठी, दुय्यम निबंधक कार्यालयातून येणाऱ्या ई म्युटेशनचे फेरफार नोंदी उशिराने घेत आहेत. तसेच फेरफार घेतल्यास त्यावरील हरकतीचा शेरा जाणूनबुजून लवकर भरत नाहीत. यासाठी खातेदार शेतकऱ्यांचीअक्षरक्ष: वाट पाहिली जाते.
हरकतीचा शेरा भरल्यानंतर, पधंरा दिवसांचा कालावधी लोटल्यानंतरही मंडल अधिकारी फेरफार निर्गत करत नाही. ही हवेली तालुक्यातील ई म्युटेशन व फिफो प्रणालीची धक्कादायक व सत्य परिस्थिती आहे. या प्रलंबित कारभाराची संपूर्ण ऑनलाईन माहिती वरिष्ठ कार्यालयातील अधिकाऱ्यांना एका क्लिकवर दिसत असते. मात्र, या विलंबाच्या कारभाराबाबत तलाठी व मंडलाधिकाऱ्यांना साधी नोटीस आजपर्यंत बजावण्यात आली नसल्याने संबंधित तलाठी व मंडल अधिकारी सेफ झोनमध्ये प्रोटोकॉलप्रमाणे जोरदार बॅटिंग करीत आहेत.
खालपासून वरपर्यंत सर्वजण मिंधे, मग कारवाई कोण करणार?
लाखमोलाचा प्रोटोकॉल देऊन तलाठी व मंडल अधिकारी अ,ब आणि क वर्गाच्या पोस्टिंग घेत असतात. त्यामुळे खालपासून वरपर्यंत सर्वांचीच ऐकमेकांशी मिलीभगत दिसून येत असल्याने नागरिकांच्या कामाला खुलेआम ‘विलंबाचा कोलदांडा’ लावला जातो. विलंबाच्या कारभाराबाबत वरिष्ठांनी डोळ्यांवर नेहमीप्रमाणे पट्टी बांधल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चुकीची कामे करणाऱ्या तलाठी व मंडळ अधिकाऱ्यावर कारवाईचा अद्याप हवेलीत ‘किरण’ दिसत नसल्याने आर्थिक सापशिडीचे ‘आखाडे’ जोरदार रंगल्याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा मोबाईल बंद असल्याने त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.
याबाबत बोलताना वडकीचे तलाठी दादा झंजे म्हणाले की, मागील दहा दिवसापूर्वी सर्व्हर डाऊन होते, त्यामुळे ऑनलाईनची कामे करता आलेली नाहीत. त्यामुळे सब रजिस्ट्रार कार्यालयातून आलेले फेरफार घेण्यास उशीर झाला आहे. त्या फेरफारच्या नोटीसा लवकरच भरण्यात येतील. तसेच कार्यालयीन कामकाजाचा फलकही लावण्यात येईल.
याबाबत उरुळी देवाची सर्कल मनीषा भोंगळे यांनी सांगितले की, मी पदभार स्वीकारल्यानंतर 10 जानेवारीला माझी डीएससी (डिजीटल स्वाक्षरी) सुरू झाली आहे. वडकी गावातील एकूण 111 फेरफार प्रलंबित आहेत. त्यापैकी 16 जणांनी हरकती देऊन तक्रार अर्ज दिलेले आहेत. या तक्रार अर्जातील चार नोंदीवर मुदतीवर अपील करण्यात आलेले आहे. माझ्याकडे जेवढे फेरफार आलेले आहेत, ते सर्व फेरफार निर्गत केलेले आहेत. त्यातील दहा ते बारा फेरफार टेक्निकल अडचणीमुळे प्रलंबित असून, दस्तावेज दुरुस्त करुन आल्यानतंर निर्गत केले जातील. तसेच ज्या फेरफारांवर तक्रार अथवा हरकती आलेल्या आहेत, त्या पक्षकारांना नोटीसा बजावण्याचे काम सुरू असून पुढील पंधरा दिवसांत प्रकरणे निकाली काढण्यात येतील.