पुणे : बैलगाडा शर्यतीत वापरले जाणारे निशाण आणि घड्याळ कालबाह्य होणार आहे. बैलगाडा शर्यतीत आता सेन्सर घड्याळाचा वापर केला जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथील यात्रेत सेन्सर डिजिटल पद्धतीचा प्रथमच वापर करण्यात येणार आहे.
बैलगाडा शर्यतीत अनेक वेळा घड्याळ वेळेत सुरू होत नाही, तसेच निशाण वेळेत टाकले जात नाही, तर वादविवाद होतात, यामुळे अनेकदा चालू बैलगाडा शर्यत बंद करावी लागते. याच पार्श्वभूमीवर आता अवसरी बुद्रुक येथे होणाऱ्या यात्रेमध्ये सेन्सर घड्याळाचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे शर्यत पारदर्शकपणे होण्यास मदत होईल, असे पुणे जिल्हा बैलगाडा मालक चालक संघटनेचे अध्यक्ष जयसिंगराव एरंडे, प्रसिद्ध बैलगाडा मालक रामशेठ गावडे आणि अवसरी बुद्रुक ग्रामस्थांनी सांगितले.
असा केला जाणार यंत्रणेचा वापर
बैलगाडा घाटात सेन्सर घड्याळ वापरताना घाटाच्या खालच्या बाजूला गाडा सोडताना घाटामध्ये गाड्याच्या १५ फूट पुढे ७ फुटाच्या उंचीवर इलेक्ट्रॉनिक धागा बांधला जातो. घाटाच्या वरच्या बाजूला निशान असलेल्या ठिकाणीही एक धागा बांधला जातो. खालच्या आणि वरच्या धाग्याचे कनेक्शन केबलच्या माध्यमातून जोडतात.
बैलांच्या वरती सात फुटाच्या उंचीवर धागा बांधल्याने बैलाच्या पुढील जुकाटाला बांधलेल्या अँटीनाने पहिला धागा तुटतो. त्यावेळी घड्याळ सुरू होते. घाटाच्या शेवटी असलेल्या ठिकाणी बैलगाडाच्या दुसरा धागा तुटल्यानंतर घड्याळ बंद होवून गाडा किती सेकंदात गेला हे मोठ्या स्क्रीनवर दिसते.
पुणे जिल्ह्यात प्रथमच सेन्सर पद्धतीचा वापर
यापूर्वी सेन्सर पद्धत ही जालना, संभाजीनगर, बुलढाणा या ठिकाणी वापरली गेली आहे, मात्र पश्चिम महाराष्ट्रात अवसरी बुद्रुक येथे प्रथमच याचा वापर केला जाणार आहे. याचा सराव काही दिवसांपूर्वी अवसरी येथील घाटात करण्यात आला आहे.