पिंपरी, (पुणे) : ३ वर्षापूर्वी एका गुन्ह्यात दीराला पोलिसांकडे पकडून दिल्याच्या रागातून पतीसह दीर आणि जावेने महिलेच्या डोक्यात दगड घालून निर्घुण खून केल्याची घटना घडली आहे. एवढंच नाही तर मृतदेह जमिनीत पुरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना मावळातील चांदखेड येथील डोंगरावर १६ जानेवारी रोजी घडली आहे. पती आणि जावेला पोलिसांनी अटक केली असून दीर सध्या फरार झाला आहे.
सुनंदा लक्ष्मण चव्हाण (वय २७, रा. पाचाणे, ता. मावळ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पती लक्ष्मण रामभाऊ चव्हाण (वय ३२) आणि जाऊ नंदा गणेश चव्हाण या दोघांना अटक केली आहे. दीर गणेश उर्फ लहू रामभाऊ चव्हाण (रा. पाचाणे, मावळ) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. खून झालेल्या महिलेचा भाऊ शाम नामदेव चव्हाण (वय २८, रा. केळवडे, ता. भोर ) यांनी शिरगाव – परंदवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, लोणीकंद येथील एका गुन्ह्यात सुनंदा हिने दीर गणेश याला पोलिसांकडे पकडून दिले होते. त्यावेळी पोलिसांनी आरोपी गणेशला अटक केली होती. याच रागातून सर्व आरोपींनी सुनंदा यांचा खून करण्याचा कट रचला. १६ जानेवारीला सकाळी सुनंदा यांच्या डोक्यात दगड घालून खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह चांदखेड येथील डोंगरावर जमिनीत पुरल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, फिर्यादी शाम चव्हाण यांनी त्यांची बहिण सुनंदा हिला अनेकवेळा फोन केला. मात्र तिने फोन उचलला नाही. त्यामुळे फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाईकांनी शिरगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी सुनंदा हिच्या पतीसह नातेवाईंकडे कसून चौकशी केली. चौकशी दरम्यान त्यांनी खुन करुन मृतदेह डोंगरालगत असलेल्या झुडपात पुरल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली. पुढील तपास फौजदार सूर्यवंशी तपास करीत आहेत.