उरुळी कांचन (पुणे) : पोलिस स्टेशनमध्ये काम करताना कोणताही भेदभाव करू नका, सत्ताधारी पक्षाचा असो की विरोधी पक्षाचा, चुकला तर कारवाई झालीच पाहिजे. पोलिसांचा वचक असला पाहिजे, गुन्हेगारांचं होणारे उदात्तीकरण थांबले पाहिजे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे पोलिसांना कानपिचक्या दिल्या. उरुळी कांचन येथील पोलीस स्टेशन उद्घाटनाच्या कार्यक्रमात अजित पवारांनी पोलिसांना खडे बोल सुनावले. पोलिस दलात 50 टक्के ऐवजी 100 टक्के नोकर भरती करणार असल्याचेही पवार म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर कॅबिनेटची मिळणार मंजुरी त्याला मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
अजित पवार म्हणाले की, पुण्यात काही दिवसांपूर्वी गुन्हेगारीच्या घटना घडल्या, कोण कुणाला गोळ्या घालतो, पण पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गुन्हेगारांना पकडलले. ससूनमध्ये हॉस्पिटलमध्ये जे घडलं त्यात कुणाचाच मुलाहिजा बाळगणार नाही, असं गृहमंत्र्यांनी सांगितले आहे. कोणी कितीही मोठा असो, कितीही मोठ्या बापाचा असो, त्याला सोडणार नाही. कुठे काही कानावर आले आणि कोणी काही चुकलं तर देवेंद्रजी सस्पेंड करत नाहीत तर थेट बडतर्फ करतात.
अजित म्हणाले की, गुन्हेगारांचे उदात्तीकरण थांबलं पाहिजे. सध्याच्या काही चित्रपटांचा परिणाम जाणवत आहे. पुष्पा नाम है मेरा, फुल नही फायर हुं, काय चाललंय? जेलमध्ये असलेल्या कैद्यांचे बाहेर वाढदिवस साजरे होतात. पोलिसांची इभ्रत राहिली पाहिजे. गुन्हेगारांचे होर्डिंग लागतात कसे? आता पोलिसिंगची पद्धत बदलली पाहिजे. तसेच पोलिसांचे गुन्हेगारीवर नियंत्रण राहिलं पाहिजे. त्या बरोबरच पोलिस दलातील भरतीचे निकष बदलण्याची गरज आहे, उंचीची मर्यादा वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचे पवार म्हणाले. पोलिसांच्या शरीरयष्टीवर लक्ष देण्याची गरज असून एक महिला पोलिस शरीराने अगदीच किरकोळ असल्याचं निदर्शनास आले. चोराला ती कसं पकडणार असं तिला विचारलं तर लगेच ब्रेकिंग न्यूज झाली, असेही अजित पवार म्हणाले.
पुण्यालगतच्या महामार्गांवरील वाहतूक कमी करण्यासाठी रिंग रोड करणार आहे. येत्या मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. एप्रिल अखेर लोकसभा निवडणुका होतील, असाही अंदाज अजित पवार यांनी वर्तवला. सध्या साखर कारखानदारी प्रचंड अडचणीत आहे. कारखान्यात कोणीही राजकारण आणू नये, अन्यथा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. थेऊरच्या यशवंत सहकारी साखर कारखाण्यासाठी सर्वतोपरी मदत करू, असेही पवार यांनी सांगितले.