पुणे : तरुणीशी शारीरिक संबंध ठेवून नंतर लग्नास नकार देणाऱ्याविरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गंगापूर रोड नाशिक आणि पुण्यातील हिंजवडी परिसरात ऑगस्ट 2017 ते जानेवारी 2023 दरम्यान घडला आहे. या प्रकरणातील आरोपी आणि फिर्यादी दोघेही नाशिक शहरातील आहेत.
अनिकेत रामदास भदाने (वय-26 रा. नाशिक) याच्यावर भादवि कलम 376, 376/2/एन, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत नाशिक येथे राहणाऱ्या 29 वर्षीय तरुणीने गुरुवारी १८ जानेवारीला चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी दोघेही नाशिकचे आहेत. आरोपीने पीडित तरुणीसोबत ओळख करुन मैत्री केली. त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमसंबंधात झाले.
आरोपी अनिकेत याने पीडित तरुणीला आपण लवकरच आपल्या घरच्यांना सांगून लग्न करू असे आमिष दाखवले. यानंतर तरुणी सोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. नंतर मुलीने आरोपीकडे लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्नास नकार दिला. तसेच तिला शिवागाळ करुन हाताने मारहाण करुन तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.
तपासी अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक मंजुशा मुळुक यांनी सांगितले की, दोघेही नाशिकचे रहिवासी आहेत. पीडित तरुणी हिंजवडी परिसरात नोकरी करते. आरोपीने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. सदर गुन्हा नाशिक येथे घडला असून पीडित मुलीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने आरोपीवर गुन्हा दाखल करुन हा गुन्हा नाशिक पोलिसांकडे वर्ग केला जाणार आहे.