जोधपूर: राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे तुरुंगात असलेल्या आसाराम बापूच्या समर्थकांनी वकील विजय साहनी यांना उच्च न्यायालयाच्या आवारात मारहाण केली. आसाराम बापूची वकिली करण्यासाठी विजय हे दिल्लीहून आले होते. त्यांच्या याचिकेवर 18 जानेवारीला सुनावणी होणार होती. या सुनावणीत आसाराम बापूची बाजू मांडण्यासाठी विजय आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, आसाराम यांच्या प्रकृतीच्या कारणाबाबत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मारामारीच्या या घटनेनंतर उच्च न्यायालयाच्या आवारात एकच गोंधळ उडाला. या घटनेमुळे वकील संतप्त झाले. त्यांनी एका आरोपीला पकडून कुडी पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले.
राजस्थान उच्च न्यायालयाने बनावट माहिती अधिकार (आरटीआय) जबाब प्रकरणी आसाराम यांना जामीन मंजूर केला होता. आसाराम बापूच्या समर्थकांपैकी एक असलेल्या मारवाहने 2016 मध्ये जामीन मिळविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात बापूच्या तब्येतीच्या स्थितीशी संबंधित खोटे आरटीआय उत्तर सादर केले होते. यानंतर आसाराम बापूवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील सहआरोपी रविराय मारवाह याला यापूर्वीच जामीन मिळाला आहे. हे प्रकरण दीर्घकाळ चालण्याची शक्यता आहे. आसाराम बापू विरुद्ध अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाचा खटला सुरू आहे.