नवी दिल्ली: दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) चौथ्या समन्सवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हजर न झाल्याच्या पार्श्वभूमीवर ईडीने आता त्यांना पाचवे समन्स जारी केले आहे. वास्तविक, मुख्यमंत्री केजरीवाल आजपासून 3 दिवसांसाठी गोव्याला जात आहेत आणि आम आदमी पार्टी (आप) शी संबंधित सूत्रांनी सांगितले होते की, ते ईडीसमोर हजर होण्याची शक्यता नाही. अशा स्थितीत ईडीने आता पाचवे समन्स जारी केले असून त्याला उद्या म्हणजेच १९ जानेवारीला हजर राहण्यास सांगितले आहे.
‘आप’शी संबंधित सूत्रांनी सांगितले की, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल तीन दिवसीय गोवा दौऱ्यावर जात आहेत. अशा परिस्थितीत ते ईडीसमोर हजर होण्याची शक्यता नाही. त्यांनी सांगितले की, सीएम केजरीवाल याआधी 11 जानेवारीला दोन दिवसांसाठी गोव्याला जाणार होते, परंतु दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या तयारीमुळे त्यांना हा दौरा पुढे ढकलावा लागला.
आपचे राष्ट्रीय संयोजक केजरीवाल यांना ईडीने हजर राहण्यासाठी पाठवलेल्या समन्सबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘कायद्यानुसार जे काही करणे आवश्यक आहे ते आम्ही करू.’अबकारी धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आपचे राज्यसभा सदस्य संजय सिंह आधीच तुरुंगात आहेत. अशा परिस्थितीत, एजन्सी आता सीएम केजरीवाल यांच्यावरही आपली पकड घट्ट करू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.