पुणे : बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर काम करत असताना तोल जाऊन खाली पडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. ही घटना कोथरुड परिसरातील किष्कींदानगर येथील तिरुपती अपार्टमेंट येथे 13 जानेवारीला सकाळी अकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी तीन ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रघुनाथ रामा (वय-44) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार रामराव आडगळे यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन बापू निवृत्ती वाघमारे (वय-40), पांडूरंग उर्फ संतोष महादेव दांड (वय-34), राजेश राजेंद्रप्रसाद यादव (वय-40) यांच्यावर भादवि कलम 304अ, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरुड येथील किष्कींदानगर येथील सर्व्हे नं. 120 येथे तिरुपती अपार्टमेंटच्या इमारतीचे काम सुरु आहे. इमारतीच्या बांधकामावर काम करत असताना पहिल्या मजल्यावर असलेल्या स्लॅबच्या डक्टला आरोपींनी कोणत्याही प्रकराची सुरक्षा जाळी लावली नाही. तसेच डक्टभोवती कोणतेही सुरक्षा ग्रील लावले नाही. त्यामुळे काम करताना त्या डक्टमधून रघुनाथ रामा खाली पार्कींमगध्ये पडले. तसेच आरोपींनी काम करत असताना कामगारांना हेल्मेट देणे गरजेचे होते. मात्र, हेल्मेट न पुरवल्यामुळे रामा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. आरोपींच्या हलगर्जीपणामुळे रघुनाथ रामा यांचा मृत्यू झाल्याचे फिर्य़ादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार आडगळे करीत आहेत.