लोणी काळभोर : राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत जून 2021 मध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने एका तरुणाला 25 हजार रुपये दंड व 20 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. पुणे जिल्हा सत्र न्यायालयातील न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी आज बुधवारी (ता.17) हा आदेश दिला आहे.
विशाल शशिकांत पाटणे (वय 25, रा. कन्हेरी, ता. खंडाळा, जि सातारा) याच्याविरोधात पीडित मुलीच्या आईने राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरून पोलिसांनी विशाल पाटणे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. ही घटना इंगवली (ता. भोर, जि.पुणे) गावच्या हद्दीत 27 जून 2021 रोजी घडली होती.
विक्रम किन्हाळे यांच्याकडे घोडे असून, ते लग्नकार्यात व लग्नाच्या वरातीमध्ये नाचवतात. त्यांच्या मदतीसाठी विशाल पाटणे हा घोड्याच्या पुढे हलगी वाजविण्याचे काम करतो. जास्त काम असेल तर विशाल हा विक्रम किन्हाळे यांच्याकडे मुक्कामी असायचा. 26 जून 2021 रोजी मुक्कामी असल्यावर सायंकाळी पीडित मुलीस धमकी देऊन पहाटे टेरेसवर भेटायला बोलावले. ती आल्यावर तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला होता.
या गुन्ह्याचा तपास राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आर. एम. साबळे यांनी केला. अतिरिक्त सरकारी वकील म्हणून अॅड. नामदेव तरळगट्टी यांनी काम पाहिले. जिल्हा कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पुणे सत्र न्यायालय पैरवी अंमलदार सहायक फौजदार विद्याधर निचीत व न्यायालय पैरवी कर्मचारी म्हणून साहेबा बाबर यांनी काम पाहिले.