पुणे : राज्यात किमान तापमानातील घट कायम राहून गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा तीन अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाला असून, पुढील दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे मंगळवारी वर्तवण्यात आला.
निफाड येथे नीचांकी तापमानाची नोंद
निफाड येथे नीचांकी ७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सर्वाधिक कमाल तापमान सोलापूर येथे ३४ अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे. मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या उत्तरेकडील भाग, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्हे थंडीने गारठले आहेत.
नागरिकांना शेकोट्यांच्या आधार
मध्य महाराष्ट्रातील प्रमुख दहा पैकी पाच शहरांमध्ये किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा कमी झाला होता. पुणे, नगर, जळगाव, सातारा, सोलापूर या शहरांचा त्यात समावेश होतो. संध्याकाळनंतर हुडहुडी भरणारी थंडी पडत आहे. कोकण किनारपट्टीवरील सर्वच जिल्ह्यांमध्ये थंडी वाढत आहे. तसेच, विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश भागात थंडीचा कडाका वाढल्याने शेकोट्या पेटल्या आहेत.
का वाढला गारठा?
पंजाब ते अरुणाचल प्रदेशपर्यंत दाट धुके पसरले आहे. उत्तरेतून महाराष्ट्राच्या दिशेने थंड वारे वहात आहेत. आकाश निरभ्र असल्याने गारठा वाढला. मंगळवारी (ता. १६) हरियानाच्या हिस्सार येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी १.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाना, बिहारसह उत्तर भारतात धुक्याचे साम्राज्य कायम आहे.