लोणी काळभोर : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यापीठ पदवी स्तरावर जून 2024 पासून लागू होणार असून, स्वायत्तता आणि त्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या अडचणी वेगळ्या स्वरूपाच्या आहेत. विषयनिहाय बदलती सरंचना, कार्यभार आणि नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम या धोरणातील आरक्षण धोरण, शिक्षण शुल्क तसेच शिक्षकांच्या कार्यभार वाढल्यामुळे वाढीव शिक्षकांची पद मान्यता करण्यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन मुंबई विद्यापीठातील इतिहास विभाग प्रमुख डॉ. संदेश वाघ यांनी केले.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयात ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी’ या विषयावर डॉ. संदेश वाघ यांचे विशेष व्याख्यान झाले. यावेळी ते बोलत होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अंबादास मंजुळकर यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगितले. नवीन शैक्षणिक धोरण समजून घेण्यासाठी आगामी कालखंडात एक दिवसीय विभागीय स्तरावर कार्यशाळा आयोजित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.