मुंबई: महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 10 जानेवारी 2024 रोजी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर आपला निकाल दिला. या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. आज मंगळवारी उद्धव ठाकरे महापत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे ठाकरे आजच्या पत्रकार परिषदेत कोणते आरोप करणार? काय पुरावे सादर करणार? याकडे राज्याच्या नजरा लागल्या आहेत. त्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरही आपली भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेणार आहेत. उद्धव ठाकरें यांच्या पत्रकार परिषदेनंतर राहुल नार्वेकर पत्रकार परिषद घेणार आहेत.
आमदार अपात्रता निकाल प्रकरणानंतर उद्धव ठाकरे यांनी जाहीर पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली होती. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आजही याच विषयावर महापत्रकार परिषद घेणार आहेत. परंतु, आजच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायदे पंडीतही उपस्थित असणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे काय भूमिका मांडणार? कोणते मुद्दे मांडणार? काय पुरावे देणार? याकडे सर्व राजकीय लोकांच्या नजरा लागल्या आहेत.
उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेला उत्तर
उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर पत्रकार परिषदेतूनच उत्तर देणार आहेत. ठाकरेंची पत्रकार परिषद चार वाजता होणार आहे. त्यानंतर लगेच पाच वाजता राहुल नार्वेकर पत्रकार परिषद घेणार आहेत. विधान भवनात राहुल नार्वेकर यांची पत्रकार परिषद होणार आहे. ठाकरेंच्या आरोपाला नार्वेकर काय उत्तर देणार? याकडे देखील सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.